जळगाव प्रतिनिधी । कोरोनाच्या काळात मानवी शरीर तंदुरुस्त, चिंतामुक्त ठेवण्यासाठी नियमितपणे चालणे किंवा धावणे फार आवश्यक आहे. त्याचे महत्व पटवून देत, धावण्याला – चालण्याला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासनाच्या क्रीडा एवं खेळ मंत्रालयाकडून ‘फिट इंडिया फ्रीडम रन’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. जिल्ह्यात १५ ऑगस्ट ते २ ऑक्टोबर हा उपक्रम राबविण्यात येत असून प्रत्येक जळगावकरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन नेहरू युवा केंद्र जळगावचे जिल्हा समन्वयक नरेंद्र डागर यांनी केले आहे.
सध्याचा धावपळीच्या जीवनात सर्वांनाच कमी- अधिक प्रमाणात चिंता, ताण- तणावाला सामोरे जावे लागत आहे. मानवी शरीर नेहमी तंदुरुस्त, व्याधीमुक्त ठेवण्याकरिता नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. “धावणे” किंवा “चालणे” हे मानवी शरीराचे सर्वात मोठे स्वातंत्र्य असून त्याची सर्वोत्कृष्ट व्यायामांमध्ये गणना होते. नागरिकांनी या क्रिया नियमितपणे कराव्यात यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी व त्यांची लठ्ठपणा, आळस, तणाव, चिंता, बी. पी. डायबेटीस यांसारख्या आजारांपासून मुक्तता करण्यासाठी केंद्र शासनाच्या युवा व खेल मंत्रालयाने “फिट इंडिया” उपक्रमांतर्गत ‘फिट इंडिया फ्रीडम रन’ हा उपक्रम राबविण्याचे नियोजन केले आहे.
त्यानुसार संपूर्ण राज्यात देखील हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. जळगाव जिल्ह्यात १५ ऑगस्टपासून नेहरू युवा केंद्राकडून जिल्ह्यात उपक्रमाला सुरुवात झाली आहे. उपक्रमांमध्ये शहरासह गावातील विविध विभागांना समाविष्ट करुन घेत सर्वसामान्य नागरिकांना देखील मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.
कसा घेणार सहभाग
जिल्ह्यातील शासकीय अधिकारी- कर्मचाऱ्यांबरोबर सर्वसामान्य नागरिक, खेळाडू, महिला- पुरुष सर्वांना या उपक्रमात सहभागी होता येणार आहे. यासाठी सहभागी झालेल्यांनी त्यांचे स्वतःचे नाव, इ मेल, संपर्क क्रमांक, धावण्याची तारीख, अंतर, राज्य, जिल्हा, गट / ब्लॉक तसेच किती अंतर चालले किंवा धावले ही माहिती www.fitindia.gov.in या संकेतस्थळावर दिलेल्या टेबल मध्ये मोबाईलद्वारे अथवा इतर अँपद्वारे रोज भरावी लागणार आहे. ही माहिती रोज अपलोड केल्यानंतर संबंधितांना उपक्रमामध्ये सहभागी झाल्याचे प्रमाणपत्र ई मेल द्वारा प्राप्त होणार आहे.
उपक्रमाची संकल्पना
जिल्ह्यात २ ऑक्टोबर दरम्यान तुम्ही कोठेही, कधीही धावू , चालू शकतात. प्रत्येक जण धावण्यासाठी, चालण्यासाठी आपल्या आवडीच्या मार्ग, व्यक्तिशः अनुकूल वेळ निवडू शकतो. आवश्यकतेनुसार काही मिनिटांची विश्रांती घेऊन पुन्हा धावणे, चालणे ही क्रिया करता येणार आहे. प्रत्येकाला स्वतःच्या वेगाने धावणे किंवा चालण्याची मुभा असणार आहे. स्वयंचलितपणे किंवा कोणत्याही ट्रॅकिंग ॲप किंवा जीपीएस घडाळ्याच्या वापर करुन धावलेल्या, चाललेल्या अंतराचा स्क्रीनशॉर्ट घेवून तो दिलेल्या संकेतस्थळावर रोज अपलोड करावा लागणार आहे.
नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक घेत आहे परिश्रम
जिल्ह्यात फिट इंडिया फ्रीडम रन राबविण्यास स्वातंत्र्यदिनी नेहरू युवा केंद्राच्या स्वयंसेवकांनी सुरुवात केली आहे. ग्रामीण भागात प्रामुख्याने हा उपक्रम राबविण्यात येत असून ३५ स्वयंसेवक त्यासाठी परिश्रम घेत आहे. कोरोना काळात प्रत्येकाने कोरोना योद्धा म्हणून इतरांना देखील प्रेरित करावे यासाठी स्वयंसेवक मार्गदर्शन करीत आहे.
स्वतःसाठी, शरीरासाठी वेळ द्या : नरेंद्र
कोरोना काळात स्वतः शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या फिट राहणे आवश्यक आहे. दररोज सकाळ, संध्याकाळ चालणे, फिरणे केल्यास आपण शरीराला फिट ठेवू शकतो. पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी सुरू केलेल्या उपक्रमात सहभागी होऊन आपण स्वतःला आणि इतरांना फिट ठेवण्यास प्रोत्साहित करावे, असे आवाहन नेहरू युवा केंद्र जळगावचे जिल्हा समन्वयक नरेंद्र डागर यांनी केले आहे.