चाळीसगाव: प्रतिनिधी । कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन जिल्हाधिकारी यांनी कडक निर्बंध लागू केले असताना पेट्रोलिंग दरम्यान धुळे बायपास रोडवरील फार वन फार वन हॉटेलात सर्रास मद्यविक्री होत असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी छापा टाकून मुद्देमाल जप्त केला.
चाळीसगाव शहरासह जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी कडक निर्बंध घालत सर्व आस्थापना हॉटेल व रेस्टॉरंटवर ५ एप्रिलपासून बंदी घातली आहे. ६ एप्रिलरोजी सायंकाळी पेट्रोलिंग दरम्यान चाळीसगाव-औरंगाबाद रस्त्यालगतच्या धुळे बायपास रोडवरील फार वन फार वन हॉटेलात सर्रास मद्यविक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
सपोनि विशाल टकले यांनी पोना प्रविण संगेले, पोकॉं प्रविण सपकाळे, पोकॉं तुकाराम चव्हाण, पोकॉं भगवान माळी व पोकॉं प्रकाश पाटील यांना घेऊन हॉटेलावर रात्री छापा टाकला हॉटेल चालक व काही ग्राहक पसार झाले. हॉटेलात १०२० रुपये किंमतीचे रॉयल स्टॅग विस्कीचे ६ नग, २९४० रुपये किंमतीचे इम्पीरीयल ब्ल्यू विस्कीचे २१ नग व १०५० रुपये किंमतीचे मॅकडॉल विस्कीचे ७ नग असा ७५०६ रुपयांचा मद्यसाठा मिळून आला. हॉटेल चालकाचे नाव माहीत नसल्याने शहर पोलिस ठाण्यात पोना संदीप भोई यांनी फिर्याद रात्री उशिरा दाखल केली. भादवि कलम १८८,२६९, २७० सह महाराष्ट्र कोव्हीड-१९ चे अधिनियम २०२० चे कलम ११ व मुंबई दारूबंदी अधिनियम कलम ६५ ई नुसार गुन्हा दाखल करण्यात आला . पो नि विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास पोना भट्टू पाटील करीत आहेत.