फळपिक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २८७ कोटींची नुकसान भरपाई मंजूर

जळगाव प्रतिनिधी । पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील ४१ हजार ३७९ शेतकऱ्यांना २८७ कोटी ५९ लाख रूपये मंजूर करण्यात आल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी सांगितली.

संभाजी ठाकूर पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील ४२ हजार १७९ शेतकऱ्‍यांनी सहभागी होउन स्वत:चा एकूण 35.72 कोटींचा विमाहप्ता ॲग्रीकल्चर इन्शुरन्स ऑफ इंडिया ली. या विमा कंपनीमार्फत भरला होता. त्यापैकी 41 हजार 379 शेतकऱ्‍यांना 54 हजार 124 हेक्टर क्षेत्रासाठी विमा संरक्षित रक्कम २८७ कोटी ५९ लाख रूपये मंजूर झाले आहे. याकरिता राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी खरीप हंगाम चक्रीवादळ व अतिवृष्टीमुळे पिकांचे झालेले नुकसान व कोव्हीड 19 या महामारीच्या पार्श्वभूमीवर वेळोवेळी संबंधित विमा कंपनी व कृषि विभागाच्या बैठका घेऊन तसेच शासनस्तरावर केलेल्या पाठपुराव्यामुळे जिल्हयातील जास्तीत जास्त शेतकऱ्‍यांना फळपिक विमा मंजुर झाला आहे.

येत्या 15 दिवसात शेतक-यांच्या बँक खात्यावर रक्कम परस्पर विमा कंपनी कडून जमा केली जाणार आहे. त्यामुळे शेतक-यांची रब्बी पिक पेरणी वेळेत होऊन खरीपामधील नुकसान भरपाई काढण्यास मदत होणार असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी सांगितले.

Protected Content