धरणगाव, प्रतिनिधी । येथील बालकवी ठोंबरे व सा. दा. कुडे विद्यालयाचे कलाशिक्षक परमेश्वर रोकडे यांनी कोरोना व्हायरसबाबत जनजागृतीसाठी फलक लेखन केले आहे.
जगामध्ये थैमान घालत असलेला आजार म्हणजे “कोरोना विषाणू” होय.हा आजार कोणाला होऊ नये म्हणून शासन यंत्रणेने तसेच सर्व मानव जातीने हवी ती काळजी घ्यायला सुरुवात केलीय. तर धरणगाव येथील बालकवी ठोंबरे व सा. दा. कुडे विद्यालयाचे कलाशिक्षक परमेश्वर रोकडे हे नेहमी आपल्या सुंदर अशा आकर्षक फलक लेखनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी व अवघ्या जनतेसाठी नेहमी एखादा प्रबोधनाचा विषय साकारून जनजागृती करीत असतात. आता पावेतो रोकडे यांनी पाणी वाचवा,लेक वाचवा,मुली वाचवा,व्यसनांपासून दूर रहा,वृक्ष लागवड,भूकंप ग्रस्तांना मदत,साक्षरता जनजागृती,फटाकेमुक्त दीपावली,प्रदूषण मुक्त पृथ्वी,लोकसंख्या, अशा अनेक विषयांवर समाज हिताचे विषय साकारून जनजागृती केली आहे. कोरोना विषाणू पासून सावध रहा. ‘घाबरू नका पण काळजी घ्या ‘ असा विषय चित्रित केला आहे.त्यांच्या या फलक लेखनातून विद्यार्थीही तसे अनुकरण करून स्वकल्पनेने चित्र काढून जागृती करीत असतात. रोकडे यांच्या या फलक लेखनाच्या माध्यमातून लोकांमध्ये जागृती होत आहे.