जळगाव प्रतिनिधी । राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा दौरा हा शासकीय होता की खासगी ? असा खोचक प्रश्न विचारून त्यांच्या या कथित दौर्यावर एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी कडाडून टीका केली आहे.
देवेंद्र फडणवीस हे काल रात्री जिल्ह्यात दाखल झाले. तर आज दुपारी त्यांनी प्रयाण केले. या पार्श्वभूमिवर, एनएसयुआचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी एका निवेदनाच्या माध्यमातून त्यांच्या दौर्यावर टीकास्त्र सोडले आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, कोविंड रुग्णालयांमध्ये नेमक्या कुठल्या सुविधा उपलब्ध आहेत.? कोविंड रुग्णालयातील रुग्णांची खरंच काळजी घेऊन उपचार केले जात आहेत का ?तसेच रुग्णालयांमध्ये डॉक्टरांची उपस्थिती असते का..? अशा प्रकारचे असंख्य प्रश्न जळगाव जिल्ह्याच्या आरोग्य विभागाच्या समोर असताना विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी मात्र यापैकी कुठल्याही प्रश्नाला वाव दिला नाही.एखाद्या वेळेस ते त्यांना ईतके महत्वाचे वाटले नसावे.. कोवीड रुग्णालयातील रुग्णांची भेट विरोधीपक्षनेते यांनी का घेतली नाही..? आपणही महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री होतात तसेच आता सध्या महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते आहात. मग आपली जबाबदारी नाही आहे का..?
कोवीड रुग्णालयातील रुग्णांची भेट घेऊन त्यांच्यावरती सुरू असलेल्या उपचाराबद्दल तसेच तिथल्या सोयीसुविधा बद्दल विचारपूस करण्याची थोडीशीही ही संवेदना आपल्या मध्ये नाही राहिली का..? असा सवाल जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी उपस्थित केला. केवळ सर्व अपेक्षा महा विकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांकडूनच करायच्या व स्वतः मात्र लांब उभे राहून अंग शिकण्याचे काम विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले असल्याची टीका त्यांनी केली.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी माजी पालकमंत्री तथा माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या मतदारसंघातील जामनेर शहरांमधील सामान्य रुग्णालयांमध्ये साडेतीन तास उलटून सुद्धा रुग्णवाहिका न मिळाल्याने कोवीड रुग्णाचा मृत्यू झाला. आज विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस जिल्हा दौर्यावर आले असता आपले सहकारी तसेच संकटमोचक गिरीश महाजन यांच्या मतदारसंघातील झालेल्या सदर प्रकाराबाबत मात्र विरोधी पक्षनेत्यांनी मात्र चक्क चुप्पी साधुन त्या प्रकाराला बगल दिली. गिरीश महाजन यांच्या कृपेमुळेच जिल्ह्याची इतकी वाताहत झालेली आहे की आता कोरोना या महा संकटामध्ये मागील पाच वर्षांमध्ये कुठल्याच प्रकारच्या आरोग्याच्या सुविधा जिल्ह्यात न राबविल्यामुळे जिल्ह्यातील आरोग्याची परिस्थिती ही अति गंभीर झालेली आहे.
या निवेदनात पुढे म्हटले आहे की, गेल्या चार महिन्यांपासून कोरोना या महान संकटामुळे जळगाव जिल्ह्यातील मोठमोठ्या डॉक्टरांनी आपले स्वतःचे रुग्णालय कोरोना या आजाराच्या भीतीपोटी बंद ठेवले असता जिल्ह्यात केवळ डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांनी देवासारखे धावून या कठीण काळामध्ये जिल्ह्यातील नागरिकांना आपले रुग्णालय मार्फत रुग्णसेवा देत जीवनदान दिले. सर्व सोयी-सुविधा डॉ उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे असल्यामुळे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांच्या आदेशान्वये जिल्हा सामान्य रुग्णालय म्हणून डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अधिग्रहित करण्यात आले व कोविड रुग्णांसाठी शहरांमधील शासकीय महाविद्यालय व रुग्णालय हे कोविल रुग्णालय म्हणून अधिकृत केले. परंतु जिल्हा सामान्य रुग्णालय डॉ उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय म्हणून अधिग्रहित केल्यामुळे काही खाजगी स्वयंघोषित आरोग्यदूत यांचे कमिशन व भ्रष्टाचार अचानक बंद पडल्यामुळे डॉ उल्हास पाटील हे काँग्रेस पक्षाचे असल्यामुळे राजकीय द्वेषापोटी माजी मंत्री गिरीश महाजन सतत डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्यावरती टीकेची झोड सोडत असतात.
जामनेर शहरात माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या सहकार्याने कोविड रुग्णांसाठी एक प्रशस्त कोवीड सेंटर गेल्या अनेक दिवसांपासून तयार झालेले आहे. परंतु हे कोवीड सेंटर कोरोना या महासंकट काळी जर जामनेर तालुक्यातील रुग्णांसाठी वेळीच कामा नाही आले तर इतक्यात प्रशस्त कोवीड सेंटरचे नंतर काय लोणचे घालायचे आहे का..? जर हे कोवीड सेंटर वेळीच रुग्णांसाठी खुले करून दिले असते तर गेल्या काही दिवसांपूर्वी रुग्णवाहिका न मिळाल्यामुळे आपल्या जीव गमावलेल्या जामनेर मधील रुग्णाचा जीव वाचवता आला असता. परंतु माजी मंत्री हे राजकारण करण्यामध्ये इतके मग्न झालेले आहेत की जिल्ह्यातील व जामनेर तालुक्यातील नागरिकांच्या समस्या व अडचणी त्यांना दिसत नाही व ते संपूर्णपणे संवेदनशून्य झालेले असल्याची टीका मराठे यांनी या निवेदनात केली आहे.