यावल येथे विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

यावल प्रतिनिधी । येथील विरार नगर परिसरातील राहणार्‍या एका विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून यासंदर्भात यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की यावल शहरातील विरार नगर परिसरात राहणारी सबीयाबी इरफान पटेल (वय २३ वर्ष ) या महिलेने दिनांक ९ जुलै रोजी सकाळी ११:४५ वाजेच्या पूर्वी आपल्या राहत्या घरातील शेवटच्या रूममध्ये घरातील छताला असलेल्या पंख्याच्या लोखंडी हुकाला ओढणी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. यासंदर्भात मयताचा पती इरफान रशिद पटेल याने यावल पोलीस स्टेशनला सदरची खबर दिल्याने अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले करीत आहेत. मयत सबिया पटेल चे शवविच्छेदन यावल च्या ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले.

मयत महिलेस दोन मुलं असून एक बाळ आठ महिन्याचे आहे. तिने गळफास घेऊन आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकले नाही. मयत विवाहितेचे माहेर लोहारा (ता. शेगाव ) येथील असून तिचे वडील गफ्फार मजिद देशमुख हे कामानिमित्त सुरत येथे आपल्या कुटुंबासह स्थाईक झालेले आहेत.

Protected Content