अमरावती-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | येथील राणा दाम्पत्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रक्ततुला करण्याचा कार्यक्रम अखेर चौफेर टीका झाल्याने रद्द करण्यात आला आहे.
अपक्ष आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टीची दहीहंडी आज रविवारी २१ ऑगस्ट रोजी साजरी करण्यात येत आहे. या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रक्ततुला देखील करण्यात येणार होती. मात्र हा उपक्रम जाहीर झाल्यानंतर यावर चौफेर टीका करण्यात आली. सोशल मीडियातून यावर जोरदार ट्रोलींग झाले. सोबत राष्ट्रवादीसह अन्य पक्षांनी देखील यावर टिकास्त्र सोडले.
आमदार अमोल मिटकरी यांनी राणा दाम्पत्यावर टिकास्त्र सोडतांना म्हटले की, मंत्रीपद मिळवण्यासाठी रवी राणांना आणखी काय काय करावे लागेल हे येणारा काळच ठरवेल. रक्ततुलाच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसांना खूष करण्यासाठी आणि रवी राणा यांची मंत्रीपदी वर्णी लागावी म्हणून नवनीत राणांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. असा टोला मिटकरींनी मारला.
यामुळे आता फडणवीस यांची रक्ततुला रद्द करण्यात आलेली आहे. तथापि, त्यांच्या वजना इतक्या रक्ताचे रक्तदान शिबीरातून संकलन करण्यात येणार असल्याची माहिती राणा दाम्पत्यातर्फे देण्यात आलेली आहे.