जळगाव, प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुधीर मेश्राम यांचे काल निधन झाले. त्यांच्या आठवणीना उजळा कुलगुरु कार्यालयाचे माजी उपकुलसचिव अरुण एस. पाटील यांनी दिला आहे.
माजी उपकुलसचिव अरुण एस. पाटील यांच्या शब्दात, माजी कुलगुरु प्रा. सुधीर मेश्राम, यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुखद आणि क्लेषदायक आहे. उच्च विद्या विभुषीत, व्यासंगी, सुसंस्कृतपणा, सामाजिक जाण असलेली व्यक्ति काळाच्या पडद्याआड गेली. मी व माझे सहकारी, सौ. प्रज्ञा टोणगांवकर, डॉ. सोमनाथ वडनेरे, श्री. विष्णु पाटील, श्रावण पाटील, सुनिल सपकाळे, सुरेश लांडगे, दिपक वाडीले, पराग पवार, राजेश बगे आदिंनी त्यांचे समवेत काम केले आहे. रात्रदिवस काम करुन त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही कामे केलीत. आदिवासी अॅकेडमी बाबत चर्चा करीत असतांना सरांना मी सांगितले सर आपण नंदूरबारसाठी प्रस्ताव तयार करु या. सरांनी होकार दर्शविला मी आणि माझ्या सहका·यांनी प्रस्ताव तयार करुन सरांच्या मान्यतेसाठी ठेवला. सदर प्रस्ताव मा. जिल्हाधिकारी, नंदूरबार यांना पाठविला. सरांच्या मार्गदर्शनानुसार तत्कालिन कुलसचिव डॉ. ए. एम. महाजन सरांच्या मार्गदर्शनाने आम्ही पाठपुरावा करुन तसेच मेश्राम सरांनी त्यांच्या वैयक्तिक ओळखी च्या प्रयत्नाने नंदूरबार येथे सुमारे 25 एकर विद्यापीठास मिळाली.
मी प्रो. मेश्राम सरांबरोबर, उपकुलसचिव, कुलगुरु कार्यालय म्हणून पाच वर्ष काम केले आहे. सरांची प्रशासनावरची पकड अतिशय उत्तम होती. कठोर मेहनत व शिस्त पण तितकेच माणुसकीचा झरा असलेले उत्तम प्रशासक म्हणून त्यांची आठवण सदैव येईल. त्यांनी पाच वर्षाच्या कालावधीत शिस्तप्रिय प्रशासक म्हणून लौकिक मिळविला होता मात्र कुणावरही अन्याय त्यांनी कधी केला नाही.