प्राणवायूअभावी गोंदियात १५ जणांचा मृत्यू

 

गोंदिया : वृत्तसंस्था । प्राणवायूअभावी अवघ्या दीड तासात १५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री गोंदियातील वैद्यकीय महाविद्यालयात घडली.

 

महाविद्यालयातील वॉर्ड क्रमांक १,२, ३ व ४  येथील प्राणवायूचा साठा संपल्याने व अतिरिक्त सिलिंडर उपलब्ध नसल्याने १५ अतिगंभीर रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

 

गुरुवारी रात्री गोंदिया वैद्यकीय महाविद्यालयात प्राणवायूचा साठा संपल्याचे स्पष्ट होताच महाविद्यालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले. प्राणवायूचा पुरवठा सुरळीत नसल्याची बाब आरोग्य कर्मचारी  वरिष्ठांना वेळोवेळी कळवत होते. पण वरिष्ठांनी  वेळीच लक्ष दिले नसल्याचे सूत्रांनी सांगितले. याबाबतची चर्चा समाजमाध्यमांवर सुरू झाल्यानंतर आमदार डॉ. परिणय फुके यांनी भंडारा सनफ्लॅग स्टील कंपनी येथून १०० सिलिंडरची गाडी रात्री ३ वाजता गोंदिया महाविद्यालयात पाठवली. त्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने आणखी १८० सिलिंडरची व्यवस्था झाल्यानंतर प्राणवायू व्यवस्था सुरळीत झाली.

 

प्राणवायू पुरवठा करणारे श्याम मित्तल यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, मी उत्पादक नाही तर पुरवठादार आहे. नेहमी १०० ते १५० सिलिंडर लागणाऱ्या गोंदियात सध्या ६०० सिलिंडरची मागणी होत आहे. माझे देयक थकीत असले तरी पुरवठा सुरूच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Protected Content