कोरोनाचा नवा अवतार : नवीन वर्ष आणखी धोक्याचे?

 

न्यूयॉर्क: वृत्तसंस्था । कोरोनाच्या थैमानाला अटकाव करण्यासाठी ब्रिटन, अमेरिका, रशियामध्ये लसीकरण सुरू करण्यात आले असताना दुसरीकडे कोरोनाच्या नव्या प्रकाराने आणखी चिंता वाढवली आहे.

नुकत्याच करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार, कोरोनाचा नवा स्ट्रेन हा वेगाने फैलावत आहे. त्यामुळे पुढील वर्षी करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होण्याची भीती असून रुग्णालयांत जागा कमी पडेल अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. मृतांची संख्या वाढण्याचा धोका आहे.

‘ब्लूमबर्ग’च्या एका अहवालानुसार, लंडन स्कूल ऑफ हायजीन अॅण्ड ट्रॉपीकल मेडिसीनच्या सेंटर फॉर मॅथमॅटिकल मॉडलिंग ऑफ इन्फेक्शियस डिसीजने संशोधन केले आहे. त्यांच्या संशोधनानुसार, कोरोनाचा नवा स्ट्रेन हा इतर स्ट्रेनच्या तुलनेत ५६ टक्के अधिक संसर्गजन्य आहे. मात्र, अद्यापही या नव्या स्ट्रेनमुळे गंभीर आजार झाल्याचा सबळ पुरावा नाही.

या नव्या स्ट्रेनमुळे कोरोनाचा संसर्ग ७० टक्के अधिक वेगाने फैलावत असल्याचे ब्रिटन सरकारने याआधी म्हटले होते. नव्या स्ट्रेनमध्ये जवळपास २४ बदल झाले असल्याचेही सरकारी अधिकाऱ्यांनी म्हटले होते. बुधवारी, एका दिवसात ३६ हजार ८०४ करोना रुग्णांची नोंद झाली. महामारी सुरू झाल्यापासूनच्या काळातील एका दिवसातील ही सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. ही आकडेवारी समोर आल्यानंतर ब्रिटनच्या मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली. या पार्श्वभूमीवर, ब्रिटनच्या अनेक भागात निर्बंध अधिक कडक होण्याची शक्यता आहे.

सध्या विकसित केलेल्या लशी नव्या स्ट्रेनवर परिणामकारक ठरतील असा विश्वास बायोएनटेक आणि मॉडर्ना कंपनीने व्यक्त केला आहे. बायोएनटेक आपल्या लशीच्या परिणामकतेबाबत ठाम असून आवश्यकता भासल्यास सहा आठवड्यातही लस तयार करता येईल असे कंपनीने स्पष्ट केले आहे. तर, मॉडर्नाही परिणामता पाहण्यासाठी नव्या स्ट्रेनरवर लस चाचणी करणार आहे.

Protected Content