जनतेच्या खिशातून मित्रांना पैसे देण्याचे काम मोफत होत आहे — राहुल गांधी

 

 

 नवी  दिल्ली : वृत्तसंस्था । तुमचा खिसा रिकामा करून मित्रांना देण्याचं महान काम मोदी सरकार मोफत करत आहे,” असा टोला राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला इंधन दरवाढीवरून लगावला आहे.

 

 

पेट्रोल-डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत.काही आठवड्यांपासून इंधन दर वेगानं वाढले असून, काही ठिकाणी पेट्रोलचे दर शंभरीपार गेले आहे. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या दरांमुळे सामान्य नागरिक हैराण आहे. याच मुद्द्यावरून विरोधकांकडून मोदी सरकार घेरण्याचा प्रयत्न केला जात असून, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही निशाणा साधला आहे.

 

पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या दराबद्दल राहुल गांधी यांनी ट्विट करून मोदी सरकारवर टीका केली आहे. कच्च्या तेलाच्या किंमती वाढलेल्या नाहीत, तर उलट घसरल्या आहेत, हे लक्षात घ्या, असं म्हणत राहुल गांधींनी पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींना मोदी सरकार जबाबदार असल्याचं अप्रत्यक्षपणे म्हटलं आहे.

 

“पेट्रोल पंपावर गाडीत तेल भरताना जेव्हा तुमची नजर वेगानं धावणाऱ्या मीटरकडे जाईल, तेव्हा हे लक्षात घ्या की, कच्च्या तेलाचे दर वाढलेले नाहीत, तर उलट कमी झाले आहेत. पेट्रोल १०० रुपये प्रति लिटर आहे.

 

राहुल गांधी यांनी शुक्रवारीही ट्विट करत मोदी सरकारवर इंधन दराच्या मुद्द्यावरून टीका केली होती. “जून २०१४ मध्ये जेव्हा मोदी सरकार पहिल्यांदा सत्तेत आलं, तेव्हा कच्च्या तेलाचे दर ९३ डॉलर प्रति बॅरल होते. तेव्हा पेट्रोलचे दर ७१ रुपये आणि डिझेल ५७ रुपये प्रति लिटर होते. सात वर्षांनंतर कच्चा तेलाचे दर ३० डॉलरने कमी होऊन प्रति बॅरल ६३ डॉलर इतके झाले आहेत. तरीही पेट्रोल शतक ठोकत आहे, तर डिझेल त्याचा पाठलाग करत आहे,” अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती.

Protected Content