एरंडोल प्रतिनिधी । येथील दादासाहेब दिगंबर शंकर पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. आर. पाटील हे ३१ रोजी सेवानिवृत्त झाले असून त्यांची कारकिर्द कॉलेजसाठी प्रगतीचा एक महत्वाचा टप्पा ठरली आहे.
मूळचे बहादरपूर (ता. पारोळा) येथील रहिवासी असणारे डॉ. ए. आर. पाटील यांनी नंदुरबार येथील जी.टी.पी. महाविद्यालयातील वरिष्ठ विभागात अध्यापनाचे काम केले. यानंतर, ११/०९/२००५ रोजी ते एरंडोल येथील दादासाहेब दिगंबर शंकर पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी रूजू झाले. यानंतर जवळपास १५ वर्षे ते या पदावर कार्यरत होते. या कालावधीत महाविद्यालयात अनेक नवनवीन उपक्रम राबविण्यात आले. त्यांच्या कालखंडात कॉलेजची मोठ्या प्रमाणात प्रगती झाली. यात प्रामुख्याने महाविद्यालयास नॅकचे बी प्लस नामांकन मिळाले. मोफत स्पर्धा परीक्षा केंद्र, मुक्त विद्यापीठाच्या अंतर्गत पदवी पर्यंतची सुविधा, संगणक व ऑटोमोबाईल सारख्या अभ्यासक्रमांचा समावेश आदींच्या माध्यमातून त्यांनी महाविद्यालयाचा लौकीक वाढविला.
डॉ. ए. आर. पाटील हे विद्यार्थीप्रिय प्राचार्य म्हणून ओळखले जात होते. यासोबत त्यांनी सामाजिक बांधिलकी देखील जोपासली. याचमुळे त्यांना एरंडोल नगरपरिषदेत स्वीकृत नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. यासोबत त्यांनी कॉलेजमधील कर्मचार्यांच्या पतपेढीचे चेअरमन म्हणून देखील एक वर्ष यशस्वी काम पाहिले. बहादरपूर येथील रा.का. मिश्र महाविद्यालयाच्या संस्थेतही त्यांची कारकिर्द स्मरणीय ठरली आहे. तर दादासाहेब दि.शं. पाटील महाविद्यालयाने त्यांच्या नेतृत्वाखाली चौफैर प्रगती केल्याचेही कुणी अमान्य करणार नाही. सध्या लॉकडाऊन सुरू असल्याने डॉ. पाटील सरांना समारंभपूर्वक निरोप तूर्तास तरी देण्यात आला नाही. तथापि, सर निवृत्त होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर सोशल मीडियातून अनेकांनी त्यांच्या कार्यचे स्मरण करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. संस्थेचे अध्यक्ष अमित पाटील, उपाध्यक्ष आनंदराव पाटील, सचिव श्रीमती कोकिळाताई पाटील व संचालक संजय दिगंबर पाटील यांनी त्यांना आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.