प्रसाद लाड यांनी जनतेमधून एकदा तरी निवडून दाखवावे-खडसेंचे आव्हान

 

जळगाव: प्रतिनिधी । एकनाथराव खडसे यांची ताकद कमी झाल्याचा टोला मारणारे भाजपचे आमदार प्रसाद लाड यांना खडसेंनी जोरदार प्रत्युत्तर देत लाड यांनी एकदा तरी जनतेतून निवडून यावे असे आव्हान दिले आहे.

‘खडसे स्वतःच्या लेकीला का निवडून आणू शकले नाहीत? असं विचारत महाराष्ट्र भाजपचे उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी खडसेंना चिथावले होते. लाड यांच्या टीकेनंतर खडसे यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

“मी भाजमधून गेल्याचा परिणाम होत नसेल, तर भाजपचे पदाधिकारी वारंवार ‘एकनाथ खडसे गेल्यावर परिणाम होणार नाही’ असं का म्हणतात? माझं नाव वारंवार का घेत आहेत?” असा सवाल एकनाथ खडसे यांनी विचारला. उत्तर महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाची ताकद कमी झाली आहे. त्यामुळे या ठिकाणी पूर्वीपेक्षा कमी आमदार निवडून आले आहेत, असं खडसे म्हणाले.“माझ्या मुलीचा पराभव करण्यासाठी पक्षविरोधी काम करण्यात आले. भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकार्‍यांचा आतूनच ही जागा पाडण्यासाठी पाठिंबा होता” असा पुनरुच्चारही एकनाथ खडसे यांनी केला. “जनतेने मला सलग ६ वेळा निवडून दिले, प्रसाद लाड यांनी जनतेमधून किमान एकदा तरी निवडून येऊन दाखवावे” असं खुलं आव्हान खडसेंनी प्रसाद लाड यांना दिलं आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेसने एकनाथ खडसे यांना डोक्यावर चढवले आहे. एकनाथ खडसे यांच्यात इतकीच ताकद होती, तर मग मुक्ताईनगरमधून ते स्वत:च्या मुलीला का निवडून आणू शकले नाहीत? असा सवाल भाजप नेते प्रसाद लाड यांनी उपस्थित केला होता. भाजप सोडल्यानंतर आता एकनाथ खडसे यांचा उलट प्रवास सुरु झाला आहे. स्वत:चं अस्तित्व दाखवण्यासाठी त्यांची तडफड सुरु आहे. त्यांना काय करायचं ते करू दे, आम्ही उत्तर महाराष्ट्रात आमच्या परीने काम सुरु ठेवू, असे प्रसाद लाड म्हणाले होते.

Protected Content