प्रशासनाने लोकप्रतिनिधींशी समन्वय साधून काम करावे : खासदार रक्षाताई खडसे

जळगाव, प्रतिनिधी । जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर खासदार रक्षाताई खडसे यांनी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांना ११ जून रोजी पत्र पाठवून जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीसंदर्भात अवगत करून जिल्हयात केंद्र सरकारची निरीक्षण पथक पाठवून जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन जिल्ह्यातील कोरोनाच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी अधिकारी जळगाव जिल्ह्यात पाठवावे अशी विनंती केलेली होती. यानुसार पथकाने आज बैठका घेतल्या व पाहणी दौरा केला.

स्मार्ट सिटी मिशनच्या डायरेक्टर कुणालकुमार यांची महाराष्ट्रातील कोविड संदर्भात निरीक्षण व उपाययोजना संदर्भात देखरेखीसाठी केंद्राने त्यांची नियुक्ती केलेली आहे. त्यांनी स्वतःहून खासदार रक्षाताई खडसे यांच्याशी संपर्क साधला व नाथाभाऊ आणि ताईंशी चर्चा केली. जळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या वाढता प्रादुर्भावाला अटकाव घालण्यासाठी दोन अधिकाऱ्यांच्या पथक पाठवण्याबाबत आश्वस्त केले होते. केंद्रीय आरोग्य समितीचे सदस्य डॉ अरविंद अलोने वरिष्ठ प्रादेशिक संचालक आरोग्य व कुटुंब कल्याण पुणे आणि डॉ. एस. डी. खापर्डे सल्लागार सार्वजनिक आरोग्य यांनी आज जळगावमध्ये येऊन कोरोनाबाबत सुरु असलेल्या कारवाईचा आढावा घेतला. या बैठकीस जिल्हाधिकारी अभिजित राऊत, खासदार रक्षाताई खडसे, जिल्हा परिषद सी ओ डॉ. बी. एन. पाटील, सिव्हिल सर्जन डी. रामानंद व विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील व महापालिका क्षेत्रातील कोरोनाच्या एकूण केसेस, केसेसचा कालावधी, भौगोलिक विस्तारात असलेले रुग्ण, कोरोना रुग्णांमध्ये असलेले विविध आजार, कोरोना रुग्णांचे वर्गीकरण जसे अलगीकरण, बाधीत क्षेत्र, बफर झोन, अलगीकरण कक्षाबाहेरील रुग्ण, संपर्कातून व संपर्क यादीत नसलेले कोरोना रुग्ण आदी माहिती घेतली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचीही संपूर्ण संकलित केलेली माहिती, कंन्टेनमेंट झोनबाबतचा तपशील, तसेच त्याची लोकसंख्या, तेथील पॉझिटिव्ह केसेस, घर टू घर झालेला सर्वे, प्रवासाची माहिती, एकूण परजिल्ह्यातून आलेले लोक आदी विषयावर चर्चा झाली. या पथकाकडून पुढील दोन दिवस ऑन फिल्ड भेटी देऊन जिल्ह्यातील कोवीड सेंटर्सची माहिती घेतली जाणार आहे. तसेच खाजगी रुग्णालयातील व्यवस्था, शासनाकडून कोरोना प्रतिबंधासाठी केलेल्या उपाययोजना, यासाठी करण्यात आलेली खरेदी याचीही माहिती घेतली गेली. सदर पथक राज्याचे मुख्य सचिव, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे सचिव आणि जळगाव जिल्हाधिकारी यांच्याशी समन्वय साधेल. लोकप्रतिनिधी व प्रशासन यांनी मिळून काम करायला पाहिजे. खासदार, आमदार, जिप सदस्य, पंस सदस्य, नगरसेवक यांच्याशी समनव्य साधूनच काम झाले पाहिजे अशी सूचना खासदार रक्षाताई खडसे यांनी मांडली. यास जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. ३६ तासाच्या आत स्वबचा रिपोर्ट येण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आयएमएच्या डॉक्टरांकडून सूचना, अभिप्राय मागवले जातील. आयसीयू, ऑक्सिजन बेडची संख्या, ऑक्सिजन बेडवर ऑक्सिजनची मात्रा अशा एकूण सूक्ष्म विषयावर सखोल चर्चा या आढावा बैठकीत झाली. पुढील आठ दिवसानंतर परिस्थितीचा पुन्हा एकदा या पथकाकडून जळगाव जिल्ह्याचा आढावा घेतला जाईल. गोदावरी रुग्णालय येथील कोविड सेंटर येथे आणखी दोन विशेष डॉक्टरांची नेमणूक करण्याच्या सूचना खासदार रक्षाताई खडसे यांनी दिल्या. स्मार्ट सिटी मिशनचे डायरेक्टर व महाराष्ट्रातील कोविड संदर्भात निरीक्षण व उपाययोजना वरील देखरेखीची जबाबदारी असलेले कुणालकुमार पुढील १५ दिवसात स्वतः येऊन आढावा घेणार आहेत अशी माहिती रक्षाताई खडसे यांनी दिली.

Protected Content