प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे केळी कामगाराचा मृत्यू : केळी कामगार संघटनेचा आरोप

 

फैजपूर, प्रतीनिधी । खिरोदा येथील रशीद जुम्‍मा तडवी दि.१६ रोजी धूरखेडा तालुका रावेर येथे केळी वाहतूक करीत असतांना भुरळ येऊन खाली पडून त्याचा मृत्यू झाला होता. दरम्यान,केळी कामगाराचा झालेला मृत्यू हा प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे झाला असा आरोप केळी कामगार संघटनेने फैजपूर विभागाचे उपविभागीय अधिकारी अजित थोरबोले यांना दिलेल्या निवेदनात केला आहे.

सविस्तर माहिती अशी की, मंगळवार दि. १६ रोजी केळी कामगार भुरळ येऊन खाली पडल्यावर तत्काळ संबंधित व्यापाऱ्याला व सावदा येथील माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे यांना माहिती दिली होती. तर संबंधितांनी तत्काळ ही माहिती तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी व तहसीलदार यांना दिली. त्यांनी घटनास्थळी तत्काळ ॲम्बुलन्स पाठवतो रुग्णाला कुणी हात लावू नका, त्याला कोरोणा असू शकतो असे सांगितले. त्यामुळे संबंधित सर्व लोकांनी त्या कामगाराला रुग्णालयात न नेता बघ्याची भूमिका घेतली. यावेळी रात्री उशिरापर्यंत घटने ठिकाणी ॲम्बुलन्स आली नाही. शेवटी तालुक्याचे लोकप्रतिनिधी यांना संपर्क साधून सर्व हकीकत सांगण्यात आली. त्यांनी तत्काळ मृतदेह ग्रामीण रुग्णालयात रावेर येथे घेऊन यावा असे सांगितले. संबंधितांनी रावेर येथे ग्रामीण रुग्णालयात मृतदेह नेला असता तेथील कर्मचाऱ्यांनी मृतदेह घेण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला. ग्रामीण रुग्णालयात रात्रभर मृतदेह पडून होता. घडलेली घटना अतिशय वेदनादायी व संतापजनक आहे. त्यामुळे किमान कोणाचा जीव वाचवु शकत नाही तरी मरण एवढं स्वस्त करू नका अशी भावना केळी कामगार मजुरांनी व्यक्त केली. यावेळी संबंधित प्रकरणांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी कामगार संघटनेने केली आहे. मृत केळी कामगाराच्या कुटुंबीयांना तत्काळ आर्थिक मदत संबंधित व्यापाऱ्याकडून देण्यात यावी अन्यथा अनिश्चित काळासाठी जिल्ह्यातील केळी वाहतूक बंद करू असा इशारा संघटनेचे सचिव पंकज पाटील यांनी दिला आहे. दरम्यान, सावद्याचे माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे यांनी झालेली घटना अतिशय दुर्दैवी असून जर वेळेवर केळी कामगार मजुराला वैद्यकीय सहायता मिळाली असती तर कदाचित त्याचा जीव वाचला असता असे मत व्यक्त केले.

Protected Content