प्रबोधनकार ठाकरे भट भिक्षुकशाहीला नाकारणारे कडवे हिंदुत्ववादी : उर्मिला मातोंडकर

 

पुणे : वृत्तसंस्था । प्रबोधनकार ठाकरे भट भिक्षुकशाहीला पूर्णपणे नाकारणारे, तरी सच्चे आणि कडवे हिंदुत्ववादी होते. हिंदू धर्मावरील त्यांचं प्रेम ही त्यांची ओळख होती. बुरसटलेल्या रुढींच्या ते विरोधात होते, अशा शब्दात अभिनेत्री , शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी प्रबोधनकार ठाकरे यांचं वर्णन केलं.

पुण्यात ‘प्रबोधन’ नियतकालिकाच्या शताब्दी वर्ष सोहळ्यात त्या बोलत होत्या.“पुरोगामी महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय इतिहासात प्रबोधनकार ठाकरे यांचं नाव नसेल, तर तो इतिहास कधीच पूर्ण होऊ शकत नाही. कारण ते व्यक्तिमत्त्व अचाट आणि अफाट आहे. केशव सीताराम ठाकरे यांचा जन्म अत्यंत गरीब कुटुंबात झाला. लहानपणापासूनच त्यांना वाचन आणि शिक्षणाची विलक्षण ओढ होती. ‘वाचाल तर वाचाल’ हे त्यांनी युवा पिढीला सांगितलेलं वाक्य मी नेहमी आचरणात आणते. हे वाक्य नेहमीच सत्य राहील” अशा शब्दात उर्मिला मातोंडकर यांनी प्रबोधनकारांचा जीवनपट उलगडला.

“प्रबोधनकारांवर त्यांच्या आई आणि आजीचा खूप प्रभाव होता. आभाळाएवढ्या मायेसोबत आई-आजीच्या शिस्त आणि संस्कारांमुळे लहान वयातच ते घडत गेले. त्यामुळे त्यांच्या मनात स्त्रियांविषयीच्या प्रश्नांबाबत कळकळ दिसून येते. त्यांचा उदार दृष्टीकोन काळाच्या पुढचा होता. ‘प्रबोधन’ हे त्यांनी काढलेलं पहिलं नियतकालिक नाही. तर ते इयत्ता तिसरी-चौथीत असताना ‘विद्यार्थी’ या नावाचं नियतकालिक स्वतःच्या हातांनी लिहित आणि लोकांना वाटत असतं.” अशी कहाणी उर्मिला मातोंडकरांनी सांगितली.

“आर्थिक चणचण, वेळोवेळी होणारी स्थलांतरं, आजारपण, सनातनींनी केलेली कठोर अवहेलना, तत्त्वांसाठी कटू झालेले स्नेहसंबंध अशा अनेक अडचणींसमोर प्रबोधनकार कधी झुकले नाहीत, त्यांचा प्रवास कधी थांबला नाही. आयुष्य कधी तुम्हाला निराशेच्या गर्तेत ढकलून देतं, त्यातून बाहेर येण्यासाठी ‘माझी जीवनगाथा’ हे प्रबोधनकारांचं आत्मचरित्र वाचा. संघर्ष, सत्याबद्दल तुम्हाला शिकता येईल.” असंही उर्मिला मातोंडकर सांगत होत्या.

“प्रबोधनकार ठाकरे हे अष्टपैलू होते. कट्टर सुधारणावादी, बहुजनांचे कैवारी, अस्सल सत्यशोधक, सामाजिक न्यायासाठी लढणारे निर्भीड नेते, प्रखर वक्ते, पत्रकार, नाटककार, इतिहासकार, संगीतकार, नट अशी त्यांची बहुविध रुपं होती. देव -वेद यांचं प्रामाण्य झिडकारणारे ते होते. बाबा आढाव यांनी सांगितल्याप्रमाणे भट-भिक्षुकशाहीला पूर्णपणे नाकारणारे, तरी सच्चे आणि कडवे हिंदुत्ववादी. हिंदू धर्मावरील त्यांचं प्रेम, आस्था आणि श्रद्धा ही त्यांची ओळख होती. धर्मात सांगितलेल्या, मात्र बुरसटलेल्या रुढींच्या ते विरोधात होते” असे मातोंडकर म्हणाल्या.

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात ते अग्रणी सेनानी होते. तुरुंगवास सोसूनही मराठी माणूस आणि महाराष्ट्राच्या प्रश्नांसाठी ते लढत राहिले. उठ मराठ्या उठ म्हणत शिवसेना पक्षाचं बारसं त्यांनी केलं. प्रत्येक शिवसैनिकाच्या पंखात वैचारिक बळ देण्याचं काम त्यांनी केलं. त्यामुळेच जिथे सामाजिक अन्याय तिथे शिवसेना हे समीकरण कायम राहिलं, असंही उर्मिला म्हणाल्या.

राजर्षी शाहू महाराज आणि प्रबोधनकार ठाकरे यांचा एक किस्सा उर्मिला मातोंडकर यांनी सांगितला. दोघंही समाजाला पुरोगामी रस्त्यावर नेणारे समकालीन नेते होते. परंतु कोल्हापुरात काही युवकांना अंबाबाईच्या मंदिरात प्रवेश नाकारल्याचं समोर आल्यानंतर ‘अंबाबाईचा नायटा’ हा शाहू महाराजांविरोधातील अग्रलेख त्यांनी लिहिला. याचं कारण कथनी आणि करणीत फरक नसावा, असं त्यांचं मत होतं. शाहू महाराजांनीही त्यांचा दुस्वास केला नाही, असं उर्मिला मातोंडकरांनी सांगितलं.

Protected Content