गुवाहाटी ( आसाम ) : वृत्तसंस्था । प्रत्येक राज्यामध्ये मातृभाषेत शिक्षण देणारे किमान एक मेडिकल आणि एक तांत्रिक महाविद्यालय असावं हे माझं स्वप्न आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.
आसाममधील सोनितपूर येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते. आसाममध्ये भाजपा सत्तेत आल्यास अशा महाविद्यालयांची पायाभरणी करु, असं आश्वासन यावेळी त्यांनी येथील जनतेला दिलं.
मोदी म्हणाले, “ईशान्य भारत विकासाच्या मार्गावर आहे आणि त्यात आसाम महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. सामुहिक प्रयत्नांमुळे चांगली कामगिरी कशी करता येते याचं आसाम हे उत्तम उदाहरण आहे”
सोनितपूर जिल्ह्यातील धेकियाजुली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘असोम माला’ कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. आसामच्या आर्थिक प्रगतीत आणि दळणवळणामध्ये सुधारणा होण्यासाठी ‘असोम माला’ हा उपक्रम महत्वाची भूमिका बजावेल. आसाममधील रस्त्यांच्या पायाभूत सुविधांना वेग मिळावा यासाठी या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. तसेच येथील बिस्वनाथ आणि चराईदेवो येथील मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयाच्या कोनशिलेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.