चाळीसगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | बंजारा समाजाच्या काशी म्हणून ओळख असलेल्या पोहरादेवीला संत सेवालाल महाराज यांचा अश्वारूढ पुतळा व सेवाध्वजाची स्थापना आज मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. या पाश्र्वभूमीवर तालुक्यातील बंजारा समाजाला पोहरादेवीला जाण्यासाठी आ. चव्हाण यांनी स्वखर्चाने ५० वाहने उपलब्ध करून दिली.
श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे बंजारा समाजासाठी प्रथमच देशातला सर्वात मोठा पंचधातु पासुन निर्मीत केलेला संत सेवालाल महाराज यांचा अश्वारूढ पुतळा व सेवावृत्तीची स्थापना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज होणार आहे. तसेच पोहरादेवी व उमरी या तिर्थक्षेत्राचा कायापालट करणारा ५९३ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा देखील आज त्यांच्याच हस्ते होणार आहे. राज्याच्या मंत्री मंडळातील मा.मंत्री महोदय यांचे उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे.
तत्पूर्वी राज्याचे कॅबिनेट मंत्री ना. संजयभाऊ राठोड यांच्या उपस्थितीत नुकतीच सहविचार सभेचे आयोजन चाळीसगाव येथे करण्यात आले होते. या सभेत आमदार मंगेश चव्हाण यांनी या भव्य दिव्य गौरवशाली सोहळयात बंजारा समाजातील भाविकांची किमान ५० वाहने पाठविण्यात येतील असा शब्द दिला होता. त्यानुसार त्यांनी दिलेला शब्द पाळत व आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवत आमदार मंगेश चव्हाण यांच्या माध्यमातून काल रोजी रात्री १० वाजेला चाळीसगाव येथील शिवनेरी पार्क येथून १२०० हुन अधिक भाविक पोहरादेवी कडे रवाना झाले आहे.
या वाहनांना शिवनेरी फाऊंडेशनच्या अध्यक्षा प्रतिभा चव्हाण, माजी जि. प. सभापती राजु राठोड यांनी सेवालाल महाराजांचा झेंडा दाखवून वाहनांचा ताफा रवाना केला. यावेळी जय सेवालाल बोलो… पोहरादेवी चालो… सेवालाल महाराज की जय अश्या जयघोषात यावेळी वातावरण दुमदुमून गेला.