पोलीस कर्मचाऱ्याच्या माणुसकीने अनोळखी वृद्धास मिळाले जीवदान

पाचोरा, प्रतिनिधी |  येथील गाडगेबाबा नगर परिसरात तीन ते चार दिवसांपासून जखमी अवस्थेतील अनोळखी व्यक्तीस पोलीस कर्मचारी चंद्रकांत ब्राम्हणे यांनी माणुसकी व सतर्कता दाखवत ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्याने त्या व्यक्तीस जीवदान लाभले आहे. चंद्रकांत ब्राह्मणे यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पाचोरा शहरातील गाडगेबाबा नगर भागात राहणारे पोलिस चंद्रकांत ब्राम्हणे हे पाचोरा येथे पोलिस उपविभागीय कार्यालय येथे सेवेत आहेत.  ते राहत असलेले गाडगेबाबा नगर परिसरात रोडवरील बस स्टॅण्डवर तीन ते चार दिवसांपासुन एक अनोळखी इसम वय अंदाजे ५० ते ५५ हा जुन्या जखमांनी विव्हळत पडलेला होता. त्यास बोलता सुध्दा येत नव्हते. तेव्हा पोलिस चंद्रकांत ब्राम्हणे यांनी पोलिसातील माणुसकी ची भावना जागृत झाली असता त्यांनी  स्थानिक रहिवाशी विजय रामकृष्ण सोनवणे, रोहिदास बारकु पाटील यांच्या मदतीने रुग्णवाहिका १०८ ला कॉल करुन सदर अनोळखी इसमास पाचोरा ग्रामीण रुग्णालय येथे उपचाराकरीता दाखल केले आहे. शहरातील चंद्रकात ब्राम्हणे, विजय सोनवणे व रोहिदास पाटील यांनी दाखविलेल्या माणुसकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.  सदर अनोळखी इसमाबाबत कोणास काही माहिती असल्यास संबंधितांनी जळगाव सरकारी रुग्णालयात संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Protected Content