जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याच्या रागातून जळगाव तालुक्यातील लमांजन येथे तरूणासह घरातील चौघांना लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना शनीवारी ११ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात ११ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील लमांजन येथे युवराज वाल्मिक पाटील (वय-२५) हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करीत आहे. युवराज पाटील याचा भाऊ पवन पाटील याने पोलीसात दिलेल्या तक्रारीच्या रागातून गावात राहणारा अशोक रामचंद्र पाटील याच्यासह इतर १० जणांनी शनिवारी ११ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास युवराज वाल्मिक पाटील, भाऊ पवना वाल्मिक पाटील, वडील वाल्मिक पाटील आणि काकू अक्काबाई राजू पाटील राहत्या घरासमोरील ओट्यावर लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत चौघेजण गंभीर जखमी झाले. याबाबत रात्री ११ वाजता युवराज पाटील याने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अशोक रामचंद्र पाटील, सोपान अशोक पाटील, अमोल भागवत पाटील, पुंडलिक दामू पाटील, बबन राजू वाघ, प्रदीप कैलास पाटील, भागवत रामचंद्र पाटील, नितीन पुंडलिक पाटील, कैलास देवीदास पाटील, साहेबराव दामू पाटील आणि दशरथ साहेबराव पाटील सर्व रा. लमांजन ता.जि.जळगाव यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रदीप पाटील करीत आहे.