पैशांच्या वादातून विवाहितेसह वडीलांना बेदम मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील बालाजी मंदिर परिसरात ऊसनवारीच्या पैशांच्या वादातून विवाहितेसह तिच्या वडीलांना मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बुधवार, १७ ऑगस्ट रोजी शनिपेठ पोलिसात चार जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

 

जळगाव शहरातील रथचौक पसिरात ज्योती अशोक साळुंखे वय ४० या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. ज्योती साळुंखे यांनी किरण लिलाधर सैंदाणे रा. जैनाबाद यांची बहिण गुड्डी कैलास इंगळे हिच्याकडून ऊसनवारीवर वीस हजार रुपये घेतले आहे. हे पैसे व्याजासह परत करावे या कारणावरुन किरण सैंदाणे, सागर सैंदाणे, कल्पना लिलाधर सैंदाणे,  व शेखर हरी सपकाळे सर्व रा. जैनाबाद या चार जणांनी १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास बालाजी मंदिर परिसरातील पूलावर ज्योती साळुंखे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यादरम्यान किरण याने ज्योती यांच्या पोटावर पाठीवर फायटरने मारहाण करत दुखापत केली.यावेळी ज्योती हिचे वडील विश्वास भोजू रोकडे यांनाही कल्पना सैंदाणे यांनी शिवीगाळ करत लोखंडी रॉडने मारहाण केली. घटनेत ज्योती साळुंखे ह्या जखमी झाल्या असून त्यांच्या तक्रारीवरुन किरण सैंदाणे, सागर सैंदाणे, कल्पना लिलाधर सैंदाणे,  व शेखर हरी सपकाळे सर्व रा. जैनाबाद या चार जणांविरोधात बुधवारी शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रकाश युवराज पाटील हे करीत आहेत.

Protected Content