कोरेगाव भीमा प्रकरण : शरद पवार यांना ४ एप्रिलला आयोगासमोर हजर राहण्याचे आदेश

पुणे (वृत्तसंस्था) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एल्गार परिषद प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यात त्यांनी कोरेगाव भीमाबद्दल काही माहिती दिली होती. याच अनुषंगाने कोरेगाव भीमा आयोगाकडून शरद पवार यांना समन्स बजावण्यात आले असून त्यांना ४ एप्रिल रोजी आयोगासमोर हजर राहण्याचा आदेश देण्यात आला आहे.

 

शरद पवार यांनी एल्गार परिषद आणि कोरेगाव भीमा प्रकरणासंदर्भात पत्रकार परिषद घेतली होती. यात त्यांनी कोरेगाव भीमा दंगलीत संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांची नावं घेतली होती. कोरेगाव भीमा हा वेगळा कार्यक्रम आहे. अनेक वर्षे एका ठिकाणी लोक स्तंभाला अभिवादन करण्यासाठी जमतात. या स्तंभाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही भेट दिलेली आहे. इथे दरवर्षी लोक येतात. इथले स्थानिक ग्रामस्थ इथे येणार्‍या लोकांना पाण्याची व्यवस्था करतात. स्थानिक आणि बाहेरून येणाऱ्यांमध्ये कोणतीही कटुता नव्हती. मात्र, आजुबाजूच्या खेड्यात संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे यांनी फिरुन वेगळं वातावरण निर्माण केले, असा आरोप पवार यांनी केला होता. त्यावरून पवारांना या दंगलीबद्दलची ही माहिती कोठून मिळाली. त्यांच्याकडे आणखी काय माहिती आहे? याबद्दल त्यांची तातडीने साक्ष घेण्यात यावी, अशा मागणीचा अर्ज मागणी अ‍ॅड. प्रदीप गावडे यांनी आयोगाकडे दिला होता. त्यानंतर आयोगाने आता शरद पवारांना ४ एप्रिल रोजी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

Protected Content