चेन्नई: वृत्तसंस्था । देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणातील दोषी ए. जी. पेरारिवलन याला गुरुवारी मद्रास हायकोर्टाने ३० दिवसांचा पॅरोल मंजूर केला आहे. २९ वर्षांपासून तो तुरुंगात आहे. न्या. एन. किरुबाकरन आणि पी. वेलमुरुगन यांनी तामिळनाडू सरकारला यासंदर्भात आदेश दिले आहेत.
राज्य सरकारने पेरारिवलन याची आई, अरुपथमल यांच्या वतीने केलेला विनंती अर्ज फेटाळला होता. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे मुलाला ९० दिवसांचा पॅरोल देण्यात यावा, अशी मागणी त्याच्या आईने केली होती. आता कोर्टानेच पेरारिवलन याला ३० दिवसांचा पॅरोल मंजूर केला आहे.
पेरारिवलन आणि अन्य सहा आरोपी राजीव गांधी यांच्या हत्या प्रकरणात २९ वर्षांपासून शिक्षा भोगत आहेत. अन्य सहा दोषींमध्ये व्ही. श्रीहरन उर्फ मुरुगन, व्ही श्रीहरनची पत्नी टी सुतेंद्रराज अलैह संथान, जयकुमार, रॉबर्ट पायस, रविचंद्रन आणि नलिनी श्रीहरन हे आहेत. तामिळनाडूत २१ मे १९९१ रोजी एका निवडणूक प्रचारसभेला संबोधित करण्यासाठी राजीव गांधी गेले होते. त्यावेळी त्यांची हत्या झाली होती.