पुरूषसत्ताक समाजाची घुसळण करण्याची गरज – कवयित्री नीरजा

भुसावळ प्रतिनिधी । स्त्रीपुरूषांविषयी समाजाने भिन्नता ठरवून दिलेली आहे. बाईचं जगणं दुय्यम किंबहुना दुय्यम लिंगधारक म्हणून तिची ओळख आहे. पुरूषसत्ताक मानसिकतेतून समाज बाहेर यायला हवा. पारदर्शी समाज निर्मितीसाठी पुरूषसत्ताक समाजाची घुसळण करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन दहावी मराठी पाठ्यपुस्तकातील “आश्वासक चित्र” कवितेच्या कवयित्री नीरजा यांनी केले.

जळगाव जिल्हा मराठी अध्यापक संघातर्फे सुरू असलेल्या ऑनलाईन संवाद सत्राच्या दुसऱ्या टप्प्यातील पाचव्या सत्रात त्या बोलत होत्या. प्रारंभी मराठी भाषा अभ्यास मंडळ सदस्य डॉ. जगदीश पाटील यांनी प्रास्ताविकातून उपक्रमाची भूमिका विशद केली. जळगाव जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. मंजुषा क्षीरसागर यांनी लेखक-कवींशी थेट संवाद हा उपक्रम स्तुत्य असल्याचे सांगून पाठ-कविता लेखनामागची भूमिका व त्यातून देण्यात येणारा संदेश थेट लेखक-कवींच्या तोंडून ऐकायला मिळणे हे भाग्य आपल्या सगळ्यांना डॉ. जगदीश पाटील यांनी आयोजित केलेल्या उपक्रमाच्या माध्यमातून उपलब्ध झाले असल्याचेही त्या म्हणाल्या. बालभारती मराठी विषय समिती सदस्य डॉ. माधुरी जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. मनीषा भटकर यांनी कवयित्री नीरजा यांचा परिचय करून दिला. त्यानंतर संवाद साधताना कवयित्री नीरजा म्हणाल्या की, स्त्री-पुरूष समानतेचे एक आश्वासक चित्र समाजात निर्माण व्हावे यासाठी वीस वर्षांपूर्वी ही कविता लिहिली. ही कविता ज्या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे त्या “निरर्थकाचे पक्षी” यात सामाजिक, धार्मिक, राजकीय, महानगरी, स्त्रीविषयक जाणिवा मांडल्याआहेत. स्त्रीपासून सुरूवात म्हणून स्त्रीगणेशा काव्यसंग्रह लिहिला. सावित्री नावाच्या कवितेतून स्त्रीयांचे स्थान सांगितले. लिंगाधिष्ठित विभाजित करणारी प्रतीके व प्रतिमा वापरून कविता लेखन केले आहे. झरोक्यातून जेवढे आभाळ दिसते तेवढेच आभाळ स्त्रीचे आहे. ते वाढावे ही आशा आहे. स्त्रीच्या नशिबी सावलीही नसल्याने “तापलेल्या उन्हाच्या आडोशाला” अशी कवितेची सुरूवात केली आहे. आवडतात म्हणून काही गोष्टी करायला हरकत नाही परंतु सक्तीने केल्या तर स्त्री स्वातंत्र्यावर गदा येत असते.

स्त्रीगणेशातील कुंकवाची कविता यामध्ये मी म्हटले आहे की,
“कुंकू बरं दिसतं म्हणून रेखावं, त्यात फार काही नसतं,
त्याने दिलेल्या जखमांचं, पोळलेलं कोरडेपण असतं”

असे रोखठोकपणे वास्तव मांडण्याचे काम काव्यलेखनातून केले असल्याचे कवयित्री नीरजा यांनी अतिशय परखडपणे सांगितले. बलवाडी, ता. रावेर येथील आचल पाटील हिने आभार मानले.

Protected Content