मुंबई (वृत्तसंस्था) सुशांतच्या आत्महत्या प्रकरणातील पुराव्यांशी कोणतीही छेडछाड होऊ नये, यासाठी सुशांत आत्महत्या प्रकरणात लक्ष घालण्याचे आवाहन त्याच्या बहिणीने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना केले आहे.
सुशांत सिंह राजपूतची बहिण श्वेता सिंह किर्तीने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत पंतप्रधान मोदींना आवाहन केले आहे. तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे, माझे मन मला सांगतेय की पंतप्रधान मोदी नेहमीच सत्यासोबत आणि सत्यासाठी उभे राहतात. आम्ही खूप सामान्य कुटुंबातून आलो आहोत. माझा भाऊ बॉलिवूडमध्ये होता तेव्हा त्याचा कुणीही गॉडफादर नव्हता. आमचाही आत्ता कुणी गॉडफादर नाही. तुम्ही तातडीने या प्रकरणात लक्ष घालावे, अशी माझी विनंती आहे. तसेच या प्रकरणाचा तपास योग्यरितीने व्हावा, पुराव्यांशी कोणतीही छेडछाड होऊ नये याकडे लक्ष द्यावे. मला न्यायाची अपेक्षा आहे, असे श्वेता सिंहने म्हटले आहे. सुशांतची बहिण वारंवार सोशल मीडिया पोस्टद्वारे न्यायाची मागणी करत आहे. आता या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांसह बिहार पोलीस आणि ईडीकडून देखील केला जात आहे. तर डॉ. सुब्रमण्यम यांच्यासोबतच शेखर सुमन. भाजपा आमदार रूपा गांगुली यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.