जळगाव प्रतिनिधी । आमदार राजूमामा भोळे यांनी मक्तेदारासोबत अधिकार्यांचे संगनमत असेल तर आठ दिवसांत पुरावे द्यावे, अन्यथा जाहीर दिलगिरी व्यक्त करावी असे आव्हान शिवसेनेचे नितीन लढ्ढा यांनी पत्रकार परिषदेत दिले.
आमदार राजूमामा भोळे यांनी दक्षता समितीच्या सभेत रामानंदनगरातील आंदोलनाबाबत बोलतांना अधिकारी व मक्तेदाराचे संगनमत असल्याचा आरोप करत आमदारकीच्या राजीनाम्याची सुपारी घेतल्याचा आरोप केला होता. त्यानंतर राष्ट्रवादीने आमदार भोळेंच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलन केले. यानंतर शिवसेनेचे नेते तथा माजी महापौर नितीन लढ्ढा यांनी आपल्या पक्षाची भूमिका मांडली. ते म्हणाले की, पालिकेत सत्ता असताना आंदोलन करावे लागणे हे सत्ताधार्यांचे सर्वात मोठे अपयश आहे. समन्वय व योग्य नियोजन नसल्याने वड्याचे तेल वांग्यावर काढावे अशा पद्धतीची भूमिका होती. आमदार भोळे हे अधिकार्यांवर आरोप करताना त्यासंदर्भात जर आपल्याकडे पुरावे असतील तर १६ महिने आमदार भोळेंच्या पत्नी या शहराच्या महापौर होत्या मग त्या अधिकार्यांवर कारवाई करणे अपेक्षित होते. कुठलेही पुरावे नसताना जर अधिकार्यांवर आरोप करत असतील तर ही बाब निंदनीय आहे.
नितीन लढ्ढा पुढे म्हणाले की, राजूमामा भोळे यांच्याकडे अधिकार्यांच्या विरोधात पुरावे असतील तर ८ दिवसांच्या आत सादर करावे अन्यथा दिलगिरी व्यक्त करावी. नगरसेविका उज्ज्वला बेंडाळे यांनी नुकतेच आंदोलन केले. सत्ताधारी पक्षाच्या नगरसेविकांनी अशा पद्धतीने आंदोलन करणे आणि आमदारांनी असे वक्तव्य करणे याचे आश्चर्य वाटत असल्याचे लढ्ढा म्हणाले.