पुन्हा लॉकडाउनचा मुख्यमंत्र्यांचा इशारा

 

 

मुंबई : वृत्तसंस्था । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा कडक लॉकडाउनचा इशारा दिला आहे. येत्या एक दोन दिवसात निर्णय घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

 

“लसीकरणाबाबत कोणतीही भीती किंवा संभ्रम ठेवण्याची गरज नाही. लस घेताना अजिबात कळतही नाही, इतक्या सहज पद्धतीने ती दिली जात आहे. करोनाचा वाढत असल्याने लसीकरणासाठी पात्र ठरलेल्या सर्वांनी मनात कोणतीही शंका न बाळगता लस घ्यावी,” असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी यावेळी केलं.

 

पुढे  ते म्हणाले की, “कदाचित काही दिवसांमध्ये काही ठिकाणी लॉकडाउन करावा लागेल. त्यामुळे लसीकरण करुन घ्या, बाहेर अनावश्यक गर्दी टाळा, विनाकारण बाहेर येणं-जाणं टाळा, सार्वजनिक ठिकाणी मास्क लावा, हात धुवा, अंतर ठेवा”.

 

 

“कदाचित आपल्याला पुन्हा एकदा पहिल्यापासून सुरुवात करावी लागेल. अजूनही परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही, पण ती जाऊ नये असं वाटत असेल तर ही बंधन पाळणं गरजेचं आहे,” असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. औरंगाबादमध्ये निर्बंध असतानाही लोक बाहेर फिरत असल्याचं सांगण्यात आलं असता उद्धव ठाकरे म्हणाले की, “काही ठिकाणी कडक लॉकडाउन करावा लागेल. येत्या एक दोन दिवसांत आम्ही निर्णय घेणार आहोत. गरज वाटेल तिथे लॉकडाउन करावा लागेल”.

Protected Content