पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुढे ढकलला

 

पुणे : वृत्तसंस्था । कोरोना रुग्णांची शहरातील वाढती संख्या लक्षात घेत पुणे फिल्म फाउंडेशनने ११ ते १८ मार्च दरम्यान होणारा १९ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

चित्रपटगृहात होणाऱ्या महोत्सवाच्या नवीन तारख्या येत्या काही दिवसात जाहीर करण्यात येणार आहेत. ऑनलाईन पद्धतीने होणारा चित्रपट महोत्सव येत्या १८ ते २५ मार्च दरम्यान होईल, अशी माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष आणि महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी दिली आहे.

“शहरात सध्या कोरोना रुग्णसंख्येमध्ये वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर चित्रपटगृहात येण्याविषयी प्रेक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. अनेकांनी आपली चित्रपटगृहात होणाऱ्या महोत्सावासाठी केलेली नोंदणी ही ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या महोत्सावासाठी बदलून मिळू शकते का? अशी विचारणा आमच्याकडे केली. आयोजक म्हणून जास्तीत जास्त चित्रपट रसिकांपर्यंत महोत्सव पोहोचावा अशी आमची प्रामाणिक इच्छा असते, मात्र सध्याच्या परिस्थितीत हेच उद्दिष्ट साध्य होईल कि नाही याविषयी शंका असल्याने महोत्सव काही दिवसांसाठी पुढे ढकलण्याचा निर्णय आम्ही घेत आहोत,” अशी माहिती डॉ. जब्बार पटेल यांनी दिली.

“महोत्सव पुढे ढकलला जाणार असला तरी ‘शो मस्ट गो ऑन’ या उक्तीप्रमाणे येत्या १८ ते २५ मार्च दरम्यान ऑनलाईन पद्धतीने महोत्सव होणार आहे. पुढील काही दिवसांमध्ये ज्या प्रेक्षकांना ऑनलाईन पद्धतीने महोत्सवात सहभागी व्हायचे आहे. त्यांना देखील त्यासाठीची आवश्यक ती नोंदणी ‘पिफ’च्या संकेतस्थळावरून करता येईल. तसेच याआधी चित्रपटगृहात होणाऱ्या महोत्सवासाठी नोंदणी केलेल्या प्रेक्षकांना ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या महोत्सवात सहभागी व्हायचे असेल, तर तो बदल देखील करून घेणे शक्य होईल. ज्यांनी या आधीच ऑनलाईन पद्धतीच्या महोत्सवासाठी नोंदणी केली आहे, त्यांना कोणतीही नवीन प्रक्रिया करण्याची गरज नाही. १८ ते २५ मार्च दरम्यान केवळ जागतिक चित्रपट विभागातील निवडक २६ चित्रपट ऑनलाईन भरविण्यात येणाऱ्या महोत्सवात दाखविण्यात येणार आहे,” असेही डॉ. पटेल यांनी सांगितले.

 

Protected Content