नवी दिल्ली: वृत्तसंस्था । पुढील वर्षी कोरोना लस बाजारात उपलब्ध होईल, अशी शक्यता व्यक्त होत आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाची लस स्पर्धेत सर्वात पुढे आहे. भारत बायोटेक, सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया आणि झायडस कॅडिला या कंपन्या देशी लस निर्मितीचा प्रयत्न करत आहेत.
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी कोरोनाच्या लशीबाबत मंत्रिगटाला माहिती दिली. पुढील वर्षाच्या सुरुवातीला एकापेक्षा अधिक लशी उपलबध होऊ शकतील. आमचे विशेषज्ञ लशीच्या वितरणाची योजना तयार करत आहेत, असे डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले आहे.
लस २०२० च्या शेवटापर्यंत किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला रजिस्ट्रेशनसाठी उपलब्ध होईल अशी आशा जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख वैज्ञानिक सौम्या विश्वनाथन यांनी व्यक्त केली आहे. जगभरातील एकूण ४० कंपन्या क्लिनिकल स्टेजच्या अनेक टप्प्यांपर्यंत पोहोचले आहेत . १० लशी परीक्षणाच्या तिसऱ्या टप्प्यात आहेत. या लशी सुरक्षित असल्याचे दिसत असून चाचणीत त्यांचे चांगले परिणाम पाहायला मिळत आहेत, असे सौम्या विश्वनाथन म्हणाल्या.
केंद्र सरकार राज्य सरकारांकडून डेटा गोळा करत असून त्याचा उपयोग लशीच्या योग्य वितरणासाठी होणार आहे, असे आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी यापूर्वीच म्हटले आहे. देशातील सर्वांना लस उपलब्ध करणे हा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
कोविड-१९ वर लस काही महिन्यांमध्येच उपलब्ध होण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर सरकारने व्यापक स्तरावर कोल्ड स्टोरेजची उपलब्धता निश्चित करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. एक राष्ट्रीय विशेषज्ञ समूह औषध निर्मिती क्षेत्र, फूड प्रोसेसिंग आणि कृषी क्षेत्रातील खासगी आणि सरकारी कपन्यांशी चर्चा करत आहे. या बरोबरच घरोघरी जेवण डिलिव्हर करणाऱ्या स्विगी आणि झोमॅटोसारख्या कंपन्यांशीही हा समूह संपर्कात आहे. या संपूर्ण प्रयत्नांचा उद्देश तालुका स्तरावर रेफ्रिजरेटर, कोल्ड स्टोरेजची व्यवस्था करणे असा आहे.