पुढच्या पिढ्यांना बाबरी मशिदीची आठवण सांगा — ओवेसी

 

नवी दिल्ली: वृत्तसंस्था । अयोध्येत बाबरी मशीद ४०० वर्षे उभी होती याची आठवण येणाऱ्या पिढ्यांना द्यावी असे आवाहन खासदार ओवेसी यांनी आपल्या समर्थकांना ट्विटद्वारे केले आहे.

आज सहा डिसेंबर या दिवशी अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यात आली होती. त्या निमित्ताने एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी ट्विट करत भाष्य केले आहे. आमच्या पूर्वजांनी तेथे एकत्रितपणे नमाज अदा केलेली होती. तेथे त्यांनी आपले रोजे देखील सोडले होते. जेव्हा त्यांचा मृत्यू होत असे तेव्हा त्यांना याच परिसरात आसपास दफल केले जात असे, असे ओवेसी यांनी म्हटले आहे.

ओवेसी यांनी यानंतर आणखी एक ट्विट केले आहे. हा अन्याय आम्ही कधीही सहन करणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. ते लिहितात, ‘आजच्याच दिवशी १९९२ मध्ये संपूर्ण जगासमोर आमची मशीद ध्वस्त करण्यात आली होती. जे याला जबाबदार होते, त्यांना एका दिवसाची देखील शिक्षा मिळाली नाही.’

६ डिसेंबर १९९२ मध्ये अयोध्येतील बाबरी मशीद उद्ध्वस्त करण्यात आली. हे लक्षात घेत अयोध्येत आज सहा डिसेंबर या दिवशी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जिल्ह्यात आजच्या दिवशी कोणत्याही प्रकारच्या कार्यक्रमांना परवानगी देण्यात आलेली नाही. आजच्या दिवशी कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्याविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Protected Content