जळगाव प्रतिनिधी । शहरातील पिंप्राळा येथील पांढरे प्लॉट येथील बांधकाम व्यवसायिकाला मारहाण करत सात ते आठ जणांनी चॉपर, हॉकीस्टीक वापर करत घरावर दगडफेक करत मालमत्तेच वाहनांचे नुकसान केल्याची घटना घडली. याप्रकरणी चार संशयितांना पोलिसांनी अटक केली असून नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रकाश विठ्ठल कोळी वय २७, नितेश मिलिंद जाधव वय २१ दोन्ही रा. मढी चौक, प्रविण गोकूळ कोळी वय २३ व सुरेश एकनाथ कोळी वय २३ दोन्ही रा. पांढरी प्लॉट, पिंप्राळा अशी अटक केलेल्या चार संशयितांची नावे आहेत.
पिंप्राळा येथील पांढरे प्लॉट येथे किरण राजेंद्र भावसार (वय ३६) हे आई, वडील पत्नी व दोन मुले यांच्यासह वास्तव्यास आहेत. ते बांधकाम क्षेत्रात भागीदारीचा व्यवसाय करुन कुटुंबांचा उदरनिर्वाह भागवितात. काल शनिवारी ७ ऑगस्ट रोजी रात्री १०.३० वाजता सुमारास किरण भावसार हे त्याच्या घराच्या बाहेर ओट्यावर बसले होते. यावेळी घरासमोर रामानंदनगरातील दिनेश प्रकाश कोळी, त्रृषीकेश, दादु, मितेश जाधव, गप्या, तेजस, प्रकाश कोळी, सुपड्या, योगेश कोळी, सुरेश यांच्यासह दहा ते १५ जण आले. किरण भावसार यांना उद्देशून तु जामीन का करत नाही, आम्हाला पैसे का देत नाही असे म्हणाले. त्यावर भावसार यांनी माझा काय संबंध असे बोलले असता, त्रृषीकेश, दादू व मितेश जाधव या तिघांनी चॉपर हॉकिस्टीकच्या दहशत माजविली तसेच शिवीगाळ करत चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच तु भरपूर पैसे कमविले आहे, तुला आम्ही संपवून टाकू अशी धमकी दिली. यावेळी भावसार यांना त्यांचा मित्र अजय याने संबंधितांपासून वाचवून घरात नेले.
त्यानंतरही संबंधितांनी भावसार यांच्या घरावर दगडफेक केली तसेच दरवाजाचे तसेच एम.एच.१९ डी.एम. ६१४४ व एम.एच. १९ सी.ई. ९०१४ या दोन दुचाकींचे नुकसान केले. भावसार यांच्या घराच्या बांधकामासाठी विटा उचलून संबंधितांनी त्याच्याच घरावर दगडफेक करुन मालमत्तेचे नुकसान केले. एवढ्यावर थांबले नाहीत, घरात घुसून किरण भावसार यांना चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर संबंधित दगडफेक करणारे पळून गेले. किरण भावसार यांनी घटनेची माहिती रामानंदनगर पोलिसांना दिली. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरिक्षक संदीप परदेशी यांच्यासह गुन्हे शोध पथकाने तपासचक्रे फिरवित अवघ्या काही तासातच दगडफेक तसेच मारहाण करणार्या संशयितांपैकी प्रकाश विठ्ठल कोळी वय २७, नितेश मिलिंद जाधव वय २१ दोन्ही रा. मढी चौक, प्रविण गोकूळ कोळी वय २३ व सुरेश एकनाथ कोळी वय २३ दोन्ही रा. पांढरी प्लॉट, पिंप्राळा या चार संशयितांना अटक केली आहे. संशयितांकडून चॉपर जप्त केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक संदीप परदेशी हे करीत आहेत.