पालिका निवडणुकीसाठी आमदार अनिल पाटलांच्या गटाकडून उमेदवारांची चाचपणी सुरू

अमळनेर- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | आगामी नगरपरिषदेची निवडणूक मोठ्या ताकदीने लढण्याचे संकेत आमदार अनिल भाईदास पाटील यांनी दिले असून यादृष्टीने दमदार इच्छुक उमेदवारांची चाचपणी व नोंदणी देखील आमदारांच्या गटाकडून सुरू झाली आहे.

 

अमळनेर नगरपरिषद निवडणुकीत सद्याची परिस्थिती लक्षात घेता महाविकास आघाडी च्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून व स्थानिक पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन शहर विकास आघाडी रिंगणात उतरविण्याचे संकेत मिळाले असून इच्छुकांचा व जनतेचाही तसाच आग्रह सुरू आहे. आमदार अनिल पाटील यांच्यासोबतच माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील हे दोन्ही नेते शहर विकास आघाडीचे नेतृत्व करतील अशी माहिती देखील अधिकृत सूत्रांकडून मिळाली आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी आणि शहर विकासाच्या दृष्टीने सोबत येणारे इतर पक्षांचे मान्यवर आघाडीच्या निवडणूक समितीत असतील असेही संकेत आमदारांच्या गटाकडून दिले गेले आहेत. मात्र, याबाबत अधिकृत घोषणा बैठकीतील निर्णयानंतर होणार असल्याचे समजते. मात्र निवडणूक आयोगाने पालिका निवडणूकिचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर यासंदर्भातील हालचाली गतिमान झाल्या असून जास्तीतजास्त गोपनीय बैठकांवर भर दिला जात आहे. निवडणूक आयोगाने जादा वेळ न देता अचानक १८ ऑगस्ट मतदानाची तारीख जाहीर केल्याने थोडी धावपळ होत असली तरी लवकरच आमचे निवडणुकीचे धोरण निश्चित होऊन दमदार उमेदवारांचे पॅनल रिंगणात उतरलेले दिसेल असा विश्वास स्वतः आमदार अनिल पाटील यांनी व्यक्त केला आहे. महाविकास आघाडी सरकार बरखास्त झाले असले तरी महाविकास आघाडी मात्र जैसेथेच असून सर्व घटक पक्षांबाबत न्यायाची भूमिका घेऊन योग्य तो निर्णय होणार असल्याने सरकार बदलाचा कोणताही फरक याठिकाणी पडणार नाही. इतर पक्षाची चांगली मंडळी आणि तुल्यबळ इच्छुक उमेदवार देखील आमच्यासोबत जुळण्यास इच्छुक असून निवडणूक लढविणार ती संपूर्ण ताकदीनेच आणि सत्ताही येणार ती आमचीच! असा ठाम विश्वास आमदार अनिल पाटील यांनी व्यक्त केला आहे. मुख्यमंत्रीच्या वक्तव्यानुसार निवडणूक पुढे जावो किंवा आता होवो आम्ही कधीही तयार आहोत असेही त्यांनी दाव्याने सांगितले आहे.

पालिकेच्या इतिहासात दोनदा शविआनेच मिळविली सत्ता…
अमळनेर नगरपरिषदेच्या इतिहासात आतापर्यंत सलग दोनवेळा आमदार अनिल पाटील यांनी निर्माण केलेल्या शहर विकास आघाडीनेच बहुमताची सत्ता नगरपरिषदेवर मिळविली असून त्याआधी पालिकेवर संमिश्र अशी मिलिजुली सत्ताच स्थापन झालेली आहे. नवीन पाणीपुरवठा योजना असेल, भुयारी गटार योजना असेल किंवा आधुनिक पद्धतीचे फिश मार्केट असेल याशिवाय इतर महत्वपूर्ण कामे शविआच्या माध्यमातूनच झाली आहेत. गेल्या पंचवार्षिकमध्ये शविआने विद्यमान आमदारांच्या आघाडीला पराभूत करून लोकनियुक्त नगराध्यक्षपदी शविआच्याच पुष्पलता साहेबराव पाटील या विराजमान झाल्या होत्या. त्यांच्या कार्यकाळात देखील अतिशय चांगली विकासकामे शहरात झाली आहेत. यात प्रामुख्याने स्वच्छता आणि पाणीपुरवठा योजना,रस्त्यांचे नियोजन याकडे जातीने लक्ष दिले गेल्याने स्वच्छ व सुंदर अमळनेर म्हणून संपुर्ण जिल्ह्यात अमळनेर चे नावलौकिक वाढून जिल्ह्यात नियमित पाण्याच्या बाबतीत सुखी असेल तर ते अमळनेरच असे बोलले जाऊ लागल्याने जनतेचा देखील शविआ वरील विश्वास वाढला आहे. त्याआधी शविआच्याच जयश्री अनिल पाटील यांनी अडीच वर्ष नगराध्यक्ष पदाचा कार्यभार चांगल्या पद्धतीने हाताळून जनहीताची कामे मार्गी लावली होती. त्यानंतर अडीच वर्षे दुसरी सत्ता आल्याने कामे रखडली असताना पुन्हा शविआनेच पाच वर्षे सत्ता मिळवून उत्कृष्ठ कामकाज करून दाखविल्याने शविआच्या कार्यप्रणालीवर विश्वास वाढला आहे. अश्या परिस्थितीत पालिकेची आगामी निवडणूक शहर विकास आघाडीच्या माध्यमातूनच लढविली जावी असा आग्रह इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी आमदारांकडे धरला आहे. जनतेचाही यास पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे त्यादिशेनेच पावले टाकली जात असल्याची माहिती आमदारांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील देखील याबाबत सहमत असतील असेही त्यांनी म्हटले आहे.

शविआ ला “हॅटट्रिक” ची संधी…
आमदार अनिल पाटील यांचे निवडणुकीचे सुष्म नियोजन,शहरातील प्रत्येक प्रभागाचा असलेला गाढा अभ्यास,संपुर्ण ताकदीनं नेतृत्व करण्याचे कौशल्य,आणि महत्वाचे म्हणजे प्रत्येक उमेदवाराच्या विजयासासाठी जातीने लक्ष घालण्याची सवय आणि वातावरण निर्मितीत अग्रेसर राहण्याचे कसब यामुळे तिसऱ्यांदा शविआ ची सत्ता पालिकेवर येऊन आमदार हॅटट्रिक साधतील असा अंदाज व्यक्त होत असून दमदार उमेदवारांचा कल त्यांच्याकडेच असल्याचे चित्र शहरात आहे.

उमेदवारांचे अर्ज होताहेत प्राप्त…
निवडणूक आयोगाच्या आदेशाने पालिका निवडणूक लागल्याने आमदार अनिल पाटील यांच्या कार्यालयात इच्छुक उमेदवारांचे अर्ज प्राप्त होऊ लागले आहेत. प्रत्येक प्रभागातून अनेकांचे अर्ज येत आहेत. सदर अर्ज दि १३ जुलै नंतर गठीत होणाऱ्या समितीसमोर ठेऊन विजयश्री गाठू शकणाऱ्या उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल अशी माहिती आमदारांच्या वतीने देण्यात आलेली आहे.

Protected Content