पालघर वृत्तसंस्था । पालघरमध्ये जुन्या आखाड्याच्या दोन साधूंची जमावाने हत्या केल्याच्या घटनेचा अखिल भारतीय संत समितीने तीव्र शब्दांत निषेध नोंदवला आहे. या घटनेची चौकशी सीबीआय मार्फत करण्यात यावी, अशी मागणी संत समितीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे पत्र लिहून केली आहे. या हत्येमागे मोठे षडयंत्र असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
संत समितीचे महामंत्री स्वामी जितेंद्र नंद सरस्वती यांनी हे पत्र लिहिलं आहे. समितीने या घटनेचा नक्षलवाद्यांशीही संबंध जोडला आहे. महाराष्ट्रात दोन साधूंची हत्या झाली आहे. त्यामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे, असंही या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. तर अखिल भारतीय आखाडा परिषदेने या घटनेच्या निषेधार्थ यापूर्वीच आंदोलनाचा इशारा दिला आहे. साधूंच्या मारेकऱ्यांना अटक न केल्यास महाराष्ट्र सरकारच्याविरोधात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत गिरी यांनी दिला आहे.
संत समितीनेही या मुद्द्यावर आखाडा परिषदेसोबत असल्याचं म्हटलं आहे. राज्य सरकारने आरोपींवर कारवाई केली नाही तर देशभर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा या समितीनेही दिला आहे. यावेळी त्यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे. देशमुख यांची भूमिका संदिग्ध आहे. त्यामुळे आमचा सरकारवर विश्वास नाही. ही घटना एकाच समुदायाच्या मार्फत झाल्याचं ट्विट त्यांनी केलं आहे. त्यांची ही भूमिका एकतर्फी आहे. त्यामुळे हे प्रकारण आता सीबीआयकडे सोपवावे अशी मागणी केली आहे.