पालकमंत्र्यांच्या प्रयत्नांनी जिल्ह्यास मिळणार अत्याधुनीक जमीन मोजणी उपकरणे !

जळगाव, प्रतिनिधी । जमीन मोजणीच्या प्रक्रियेत येणार्‍या अडचणी, आणि भूमि अभिलेख कार्यालयातील तोकडे मनुष्यबळ या बाबींमुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांची मोठ्या प्रमाणात होणारी अडचण लक्षात घेऊन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांनी जिल्ह्यासाठी १२ आधुनीक जमीन मोजणी यंत्रे भूमि अभिलेख कार्यालयास मिळणार असून यासाठी १ कोटी २० लाख ६१ हजार ३० रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. यातून रोवर मशिन युनिट प्रणाली यांचा समावेश आहे. याचा भूमि अभिलेख विभाग आणि शेतकर्‍यांना लाभ होणार असून याच्याच मदतीने जिल्ह्यातील विविध शासकीय प्रकल्पांसाठी आवश्यक असणार्‍या जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया देखील अधिक जलद गतीने होणार आहे. उर्वरित ईटीएस मशिन आणि प्लॉटर साठी ७० लाखाची तरतूदही पुढील काळात करण्यात येणार असल्याचे ना. गुलाबराव पाटील यांनी सांगितले

 

 

या संदर्भात वृत्त असे की, भूमि अभिलेख कार्यालयातर्फे जिल्ह्यातील सर्व जमीनींच्या अभिलेख्यांचे जतन करण्यासह नागरिकांच्या मागणीसह त्यांच्या जमीनींचे मापन करण्यात येते. यात हद्दी निश्‍चीत केल्यानंतर बिनशेती, ले-आऊट, भूसंपादन, भूप्रदान आदी प्रक्रियांच्या मदतीने अभिलेख तयार केले जातात. आजवर या सर्व प्रक्रिया प्लेन टेबल या पारंपरीक पध्दतीत पार पाडल्या जातात. यासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ तर लागतेच पण अनेक ठिकाणी झाडी-झुडपी, डोंगर-दर्‍या आदींमुळे जमीन मोजणीत मोठ्या अडचणी येतात. या अनुषंगाने जिल्हा भूमि अभिलेख विभागाला जमीन मोजणीसाठी अद्ययावत उपकरणे मिळावीत अशी मागणी संबंधीत खात्यातर्फे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्याकडे करण्यात आली होती. या संदर्भात पालकमंत्र्यांनी जिल्हा वार्षिक योजनेतील नाविन्यपूर्ण योजनेच्या अंतर्गत १ कोटी २० लाख ६१ हजार ३० रूपयांच्या निधीला मान्यता मिळाली आहे. मागणी नुसार ईटीएस मशिन आणि प्लॉटर साठीही तरतूद करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात प्रत्येक तालुक्याला एक असे १५ भूमि अभिलेख कार्यालये आणि एक नगर भूमापन असे १६ कार्यालये आहेत. या सर्व कार्यालयांच्या आधुनीकीकरणासाठी या निधीचा उपयोग करण्यात येणार आहे. याच्या अंतर्गत जीआयएस प्रणालीचा वापर करून रोवर मशिनच्या मदतीने भूमि अभिलेख कार्यालयाचे अद्ययावतीकरण करण्यात येणार आहे. या प्रणालीच्या कार्यान्वयनासाठी आवश्यक असणारे जिल्ह्यात चार कॉर्स स्टेशन्स असून ते अनुक्रमे शासकीय अभियांत्रीकी महाविद्यालय, जळगाव; प्राथमिक आरोग्य केंद्र फत्तेपूर तालुका जामनेर; सार्वजनीक बांधकाम खाते कार्यालय अमळनेर आणि सार्वजनीक बांधकाम खाते कार्यालय भडगाव येथे स्थापित करण्यात आलेली आहे. याच्याशी कनेक्ट असणार्‍या १२ रोवर मशिन्स या निधीतून खरेदी करण्यात येणार आहेत. याचे करांसहीत मूल्य १ कोटी २० लाख, ३६ हजार रूपये इतके आहे.

भूमि अभिलेख कार्यालयातर्फे जिल्ह्यातील सर्व मालमत्तांचे ड्रोनच्या सहाय्याने मापन सुरू असून जीआयएस, कॉर्स, रोव्हर आणि ईटीएस या प्रणालींच्या मदतीने या विभागातील कामाला प्रचंड गती मिळणार आहे. याचा साहजीकच जनतेसह या विभागाला लाभ होणार आहे. तर महत्वाचे म्हणजे महामार्गांसह विविध शासकीय उपक्रमांसाठी भूमि अधिग्रहण करण्यासाठी ही यंत्रणा अतिशय उपयोगी ठरणार आहे.

Protected Content