पारोळ्यात जुगार अड्ड्यावर छापा ; १३ जणांवर कारवाई

पारोळा (प्रतिनिधी) शहरात मध्यरात्री एका ठिकाणी रंगलेल्या पत्ता जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा घालत १ लाख 93 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत १३ जुगारींवर कारवाई केली आहे. या कारवाईने जुगाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडालीय.

शहरातील माधव आप्पा नगर जवळील बायपास रोड जवळील एका मोकळ्या जागेत पत्ता जुगाराचा मोठा डाव रंगला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे यांना मिळाली होती. त्यांनी पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन दातीर, हवलदार रवींद्र रावते, विनोद साळी, नाना पवार यांना याबाबत माहिती दिली. या पथकाने रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास या ठिकाणावर छापा मारला. छाप्यात पोलिसांना काहीजण ताब्यात मिळाले, तर काही जण मुद्देमाल सोडून पळून गेले. घटनास्थळावरून पोलिसांनी 2400 रुपये रोख तर २५,५०० रुपयाचे मोबाईल, एक लाख 65 हजार रुपयाच्या तीन मोटारसायकली, असा एकूण १ लाख ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणी पोलीस शिपाई मोहसीन खान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित विजय पाटील, सचिन गायकवाड, विनोद राठोड, पप्पू भोई, खुशाल महाजन, रुपेश शिंदे, सचिन खत्री ,भैय्या पाटील, संतोष पाटील, किशोर भोई, योगेश पाटील, नितीन पाटील, गोरख धोबी अशा १३ जणांवर भाग सहा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व संशयितांना पोलिसांनी समज देऊन पहाटेच्या दरम्यान सोडून दिले आहे. पोलिसांच्या या छाप्यामुळे सट्टा व पत्ता जुगार चालवणाऱ्या जुगारीमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. आजही शहरात सट्टा जुगार हा बिनधास्तपणे सुरू आहे. यावरही अशा स्वरूपाचे मोठी कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.

Protected Content