पारोळा, प्रतिनिधी | येथील दिवाणी न्यायालयात आज (दि.८) राष्ट्रीय लोकन्यायालय आयोजित करण्यात आले होते. या लोक न्यायालयात एकूण ४२४ प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यात एकूण ५१ प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. या ५१ प्रकरणातून २३४७८१६ रुपयाची तडजोड रक्कम ही मान्य करण्यात आली आहे. आजच्या लोक न्यायालयात मोठ्या प्रमाणात गर्दी ही दिसून आली.
आजच्या लोकन्यायालयात ८१ दिवाणी प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यात १२ प्रकरणे ही निकाली काढण्यात आली आहेत. तर ६४ फौजदारी प्रकरणे पैकी ११ प्रकरणे ही निकाली निघाली आहेत. या निकाली फौजदारी प्रकरणात ६५ हजार रुपयाची तडजोड रक्कम निश्चित करण्यात आली आहे. तसेच न्यायालयात दाखल पूर्व अशी बँकिंग क्षेत्राशी संबंधित थकीत कर्जे २७९ प्रकरणे ही ठेवण्यात आली होती. त्यात २८ प्रकरणे निकाली निघून त्यातून २२ लाख ८० हजार ८१६ रुपये इतकी तडजोड रक्कम निश्चित करण्यात आली आहे. एकूणच या लोकन्यायालयात दोन्ही प्रकारातील ४२४ प्रकरणांपैकी दोन्ही गटांच्या समजुतीतून ५१ प्रकरणे ही निकाली निघाली काढण्यात आली आहेत. सकाळी १०.३० पासून तर सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत पॅनलप्रमुख दिवाणी न्यायाधिश कनिष्ठ स्तर एम.के. पाटील व दिवाणी न्यायाधिश प्र. ग. महानळकर कनिष्ठ स्तर, ॲड.एस.एस. निकम यांच्या नेतृत्वाखाली हे लोक न्यायालय घेण्यात आले यावेळी ॲड.ए.आर. बागुल, ॲड. अतुल मोरे, ॲड.सतीश पाटील, ॲड. शर्मा, ऍड मरसाळे, ॲड. आफ्रे, ॲड. शिंदे, ॲड. सतीश पाटील, ॲड. काटे यांच्यासह अनेक वकील उपस्थित होते.
माजी मंत्र्यांविरोधातील दावा निकाली
आजच्या लोकन्यायालयात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री डॉक्टर सतीश पाटील यांचा विरोधात हिराबाई निंबा चौधरी वैगरे राहणार तामसवाडी यांनी तामसवाडी शिवारातील शेत गट क्रमांक४८८/१, गट ४८८/२ यांच्यावरून पूर्वीप्रमाणे वहिवाट कायमस्वरूपी ठेवण्यासाठी दावा दाखल केला होता. या दोन्ही गटाची मालकी माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांची असून ते या वही वाटेवरून हिराबाई निंबा चौधरी वगैरे यांना वापर करू देत नव्हते. यावरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता. अनुषंगाने वहिवाट वरून दावा दाखल करण्यात आला होता. माजी मंत्री डॉ. पाटील यांनी या गटावरून चौधरी वगैरे यांना पूर्वीप्रमाणे कुठलीही आडकाठी न आणता वहिवाट वापरण्यास संमती दिली आहे. त्यामुळे या लोक आदालत हा दावा निकाली काढण्यात आला आहे. यासाठी ॲड. भूषण माने ॲड. उज्ज्वल मिसर, ॲड. तुषार अशोक पाटील यांनी काम पाहिले.
दोन जोडप्याचे मनोमिलन
आजच्या लोकन्यायालयात एका जोडप्याचे मनोमिलन हे करण्यात आले. यात मराठखेडा (ता. पारोळा) येथील कोमल विशाल मराठे या विवाहितेचा विवाह विशाल दिलीप मराठे रा. शिरपूर त्याच्यासोबत २०१७ मध्ये झाला होता. बाळाच्या जन्मानंतर सुमारे दोन वर्षापासून या जोडप्यांमध्ये वाद निर्माण झाला होता. तेव्हापासून कोमल ही माहेरी राहत होती. ॲड. प्रशांत ठाकरे व ॲड. सागर गोडबोले आणि नातेवाई यांच्या मध्यस्थीने या जोडप्यांमध्ये मनोमिलन करण्यात आले. दोघानी उपस्थित न्यायमूर्तींसमोर एकमेकांना गुलाब पुष्प देऊन मनोमिलन झाल्याचे स्पष्ट केले. असेच दुसऱ्या एका जोडप्याचेही यावेळी मनोमिलन करण्यात आले.