पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील बोरी धरणाच्या परिसरात गेल्या तीन-चार दिवसापासून जोरदार पाऊस सूरु असल्याने व जास्त प्रमाणात पाऊस झाल्यामुळे बोरी धरणपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होत होती. त्यामुळे ११ रोजी सायंकाळी ६ वाजता धरणाचे १५ दरवाजे उघडविण्यात आले. ९ दरवाजे ०.३० मीटर व ६ दरवाजे ०.१५ मीटरने उघडून १० हजार ८३३ क्यूसेस पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरु आहे.
बोरी धरणाजवळील पुलावरून पाणी वाहत असल्याने प्रवाशांना मध्येच थांबावे लागते. तसेच धुळे – तामसवाडी, धुळे – तामसवाडी- पाचोरा या बसेसचा मार्ग याच पुलावरून असल्याने ही वाहतूक सेवा बंद झाली आहे. गावालगत बोरी नदीवर पूल नसल्यामुळे शाळकरी मुले, शेतकरी, मजूर यांचे हाल होत आहेत. बोरी नदीवर पुलाचे काम सुरू करावे, अशी मागणी तामसवाडी गावातील नागरिकांकडून होत आहे .