पाळधी येथे भरधाव कारने दोघांना उडविले; एक ठार, एक जखमी

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील पाळधी येथे भरधाव वेगाने येणाऱ्या कारने शौचालयास बसलेल्या दोघांना जोरदार धडक दिल्याचे एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. घटनास्थळी चालकाने कार सोडून पळ काढला. याप्रकरणी पाळधी पोलीस ठाण्यात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, प्रभाकर दामोदर भावसार (वय-५०) रा. सोनारवाडा, पाळधी ता. धरणगाव आणि गावातीलच शेख मुक्तार शेख उस्मान (वय-६०) रा. कसाई वाडा, पाळधी हे दोघे आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास गावाच्या बाहेर राष्ट्रीय महामार्गावरील महाराष्ट्र स्वॉमिलजवळ शौचालयाला मोकळ्या जागेवर बसले होते. जळगावकडून पाळधीकडे जाणाऱ्या रस्त्यावर भरधाव वेगाने जाणाऱ्या कारवरील चालकाचा ताबा सुटल्याने कार थेट शेतात जावून दोघांना जोरदार धडक दिली. यात प्रभाकर भावसार हे जागीच ठार झाले. तर शेख मुक्तार हे गंभीररित्या जखमी झाले आहे. आपघात होताच कार चालकाने कार सोडून पळ काढला. दरम्यान, घटना घडताच नागरीकांची मोठी गर्दी जमली. दोघांना जिल्हा शासकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. यात प्रभाकर भावसार हे मयत झाल्याची घोषणा डॉ. संदीप पाटील यांनी केली. तर जखमीस उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

मयत प्रभाकर भावसार हे आचारी असून मोठ्या कार्यक्रमात स्वयंपाक करण्याचे काम करतात. त्यांच्या पश्चात पत्नी अरूणा, आई चिंधाबाई, दिपक आणि कल्पेश ही दोन मुले, विवाहित मुलगी असा परिवार आहे. याप्रकरणी पाधळी पोलीस ठाण्यात अज्ञात कारचालकाच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पाळधी पोलीस ठाण्याचे कर्मचारी करीत आहे.

Protected Content