पाचोऱ्यात “चौधरी सर” पुस्तकाचे प्रकाशन

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  किन्ही येथील कै. यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक विलास अमृतराव चौधरी यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा जारगावातील सोनाई सभागृहात झाला. याप्रसंगी छाया चौधरी लिखित “चौधरी सर” पुस्तकाचे प्रकाशन साहित्यिक मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

 

विलास चौधरी हे २८ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. यानिमित्त कै. यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालयातील शिक्षक, कर्मचारी, विविध क्षेत्रातील पदाधिकारी आदींनी त्यांच्या सेवेचा गौरव केला. यावेळी साहित्यिक अनंत राऊत यांचे “आनंदी जीवन” या विषयावर व्याख्यान झाले. तसेच विलास चौधरी यांच्या पत्नी छाया विलास चौधरी यांनी सरांच्या शैक्षिणक प्रवासाविषयी लिहलेले  “चौधरी सर – नैतिक मूल्य रुजवणारा मास्तर” या अनुराधा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

 

यावेळी देहू नगरपंचायतीचे मा. उपनगराध्यक्ष स्वप्निल काळोखे, शिवव्याख्याते प्रदीप कदम, डॉ. पी. एम. पाटील, दिलीप देशमुख, अनुराधा प्रकाशनाचे मिलिंद काटे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

विद्यार्थी हीच खरी संपत्ती

मी केलेली शिक्षण सेवा ही या परिसराची सेवा आहे आणि माझे सर्व विद्यार्थी हे माझी खरी संपत्ती आहे. असे मत विलास चौधरी यांनी व्यक्त केले. त्यांनी विनाअनुदानित शाळा, त्यातील शिक्षक, कर्मचारी आणि ग्रामीण भागात शिक्षण सेवा करतानाचे अनुभव कथन केले. त्यांच्यावर आधारित “चौधरी सर” या पुस्तकात त्यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकण्यात आला आहे. तर अतिशय विपरीत परिस्थितीवर मात करीत ते कसे यशस्वी, संयमी, शिस्तप्रिय, विद्यार्थीप्रिय, आदर्श शिक्षक घडले, हे या पुस्तकात मांडण्यात आले आहे. सूत्रसंचलन ए. एस. मालकर, कुमावत यांनी केले. तर याप्रसंगी उपस्थितांचे आभार कवी डॉ. स्वप्निल चौधरी यांनी मानले.

Protected Content