पाचोऱ्यात कडकडीत लाॅकडाऊन; रस्ते ओस, तालुक्यात ७.२ टक्के पाॅझीटीव्ह रुग्ण (व्हिडीओ)

पाचोरा, प्रतिनिधी ! तालुक्यात व शहरात दिवसेंदिवस कोरोना  वर डोके काढत असल्याने महसुल, आरोग्य खाते , नगरपालिका व पोलिस प्रशासनातर्फे शुक्रवारी पहाटे ते रविवारी रात्री १२ वाजेपर्यंत लाॅकडाऊन सुरू करण्यात आला आहे. कडकडीत बंदमुळे रस्ते अक्षरशः ओस पडले आहेत 

 संपूर्ण शहरात पोलिसांची गस्त असुन नागरिकांना विनाकारण बाहेर न पडण्याविषयी ताकीत दिली जात आहे. विनाकारण बाहेर पडल्यास पोलिस व पालिकेचे कर्मचारी मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करीत आहे. शहरात मेडिकल स्टोअर्स, दवाखाने व दुध संकलन आणि वितरण केंद्र, बॅंका, शासकीय, निम शासकीय कार्यालये वगळता कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.

तालुक्यात २० मार्च २०२० रोजी प्रथम एक दिवस लाॅकडाऊन लावण्यात आला होता. त्यानंतर तब्बल वर्षभरात १९ मार्च २०२१ पासुन उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत तीन दिवस लाॅकडाऊन लावण्यात आला आहे.

तालुक्यात वर्षमरात १६ हजार ६६३ नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आल्यानंतर २ हजार १५८ रुग्ण पाॅझीटीव्ह आढळले. कोरोनामुळे ७५ नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. शहरात ३ मार्च पासुन ६१७ नागरिकांची चाचणी केल्यानंतर ९ दिवसात १९२ रुग्ण पाॅझीटीव्ह आढळले असुन यापैकी ७४ रुग्ण अॅक्टीव्ह आहेत. १३ रुग्ण ग्रामीण रुग्णालय पाचोरा, १५ रुग्ण बांबरुड (महादेवाचे) येथील कोविड सेंटर व उर्वरित अॅक्टीव्ह रुग्ण ५ खाजगी कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. पाचोरा तालुक्याचा ७ . २ टक्के रुग्ण पाॅझीटीव्ह असल्याचा रेट आहे.

तहसिल कार्यालयामार्फत १ नायब तहसिलदार, ५ मंडळ अधिकारी, १० तलाठी, ५ नगरपरिषदेचे कर्मचारी अशी ५ पथके तयार करण्यात आली असून ही पथके शहरात नेमुन दिलेल्या भागात कोविड नियमांचे पालन होत आहे की नाही ? याबाबत सर्वेक्षण करीत आहे.  सांगायो नायब तहसिलदार भागवत पाटील, मंडळ अधिकारी वरद वाडेकर, प्रशांत पगार, संजय साळुंखे, प्रकाश डहाके, डी. बी. पवार, तलाठी संदिप चव्हाण, एस. आर. बागुल, कैलास बहिर, सुनिल राजपुत, तात्याराव सपकाळ, जी. आर. लांजेवार, बी. एम. परदेशी, एन. एच. शेख, बी. एल. शहाने, आर. पी. शिरसाट, पालिका कर्मचारी चंद्रकांत चौधरी, पांडुरंग धनगर, शाम ढवळे, शामकांत अहिरे, शरद घोडके यांची तहसिलदार कैलास चावडे यांनी पथकात वर्णी लावली आहे.

उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील, तहसिलदार कैलास चावडे, पोलिस उपअधीक्षक भारत काकडे, पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील हे गस्तीवर असुन जळगांव चौफुली, जारगांव चौफुली, कृष्णापुरी बस थांबा, एम. एम. काॅलेज चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, संभाजी महाराज चौक, गांधी चौक सह विविध भागात गस्त वाढविण्यात आली आहे.

शहरात किराणा दुकाने, जनरल स्टोअर्स, हाॅटेल, बिअर बार, पान टपरी, झेराॅक्स दुकाने, कटलरी दुकाने, इलेक्ट्रॉनिक दुकाने, सराफ बाजार, कापड दुकाने, खाजगी कार्यालये कडकडीत बंद असल्याने संपूर्ण रस्ते निर्मणुष्य झालेले दिसत आहे.

तालुक्यात १६ हजार ६६३ रुग्णांची कोरोना तपासणी झाल्यानंतर २ हजार १५८ रुग्ण पाॅझीटीव्ह आढळल्याने हा रेट ७ . २ टक्के इतका आहे. हा रेट ५ टक्क्यापर्यंत आणण्यासाठी आरोग्य विभागातर्फे घरोघरी जाऊन  चाचणी करण्याची योजना असुन पाॅझीटीव्ह रुग्णांच्या संपूर्ण कुटुंबाची चाचणी करुन  रेट कमी करणार असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान वाघ यांनी दिली

तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना व्हायरसचा फैलाव होत असल्याने तहसिलदार कैलास चावडे यांच्या आदेशानुसार तालुका वैद्यकीय कार्यालयातील सुपरवायझर किरण जोगी यांनी दि. १५ रोजी ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य सेवक गजानन  काकडे यांना सेवा बजावण्याचे आदेश दिले होते. मात्र आरोग्य सेवक गजानन काकडे यांनी  जोगी यांचे कार्यालयात येवुन त्यांना अरेरावीची भाषा वापरुन हुज्जत घातल्याने तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. समाधान वाघ यांनी आरोग्य सेवक गजानन काकडे यांची दि. १८ रोजी जिल्हा हिवताप अधिकारी यांचेकडे लेखी तक्रार केली आहे.

https://www.facebook.com/508992935887325/videos/523378161964681

 

Protected Content