अख्खे प्रशासन सात्री गावात; एसडीआरएफ दाखल; ग्रामस्थांची वैद्यकीय तपासणी !

अमळनेर गजानन पाटील | सुविधा नसल्याने कसे तरी पुरातून जीव मुठीत घेऊन खाटेवरून आरूषी भील या आजारी बालिकेला दवाखान्यात नेण्याचा प्रयत्न झाला तरी तिला प्राण गमवावे लागले. यामुळे हादरलेल्या प्रशासनाने आज थेट पुरामधून एसडीआरएफच्या पथकासह सात्री गाव गाठून तेथील ग्रामस्थांची आरोग्य तपासणी केली.

काल ता .७ रोजी  तालुक्यातील सात्री येथील १३ वर्षीय आरुषीची उपचाराविना मृत्यु झाल्याची घटना घडली. संतप्त ग्रामस्थानी उपचाराविना आरुषीने रस्त्यातच दम तोडल्याने  आरुषीचे शवविच्छेदन झालेले प्रेत प्रांत कार्यालयात आणले होते. यामुळे प्रचंड खळबळ उडाली होती. लाईव्ह ट्रेंडस न्यूजने या संदर्भात व्हिडीओसह दिलेल्या वृत्ताची राज्यभरात चर्चा झाली. काल ग्रामस्थांनी प्रशासनावर जोरदार आगपाखड केली होती. याची आज सकाळीच दखल घेण्यात आली.

आज एसडीआरएफच्या पथकाने आणलेल्या होडीतून सात्री येथे प्रांताधिकारी सीमा अहिरे,तहसीलदार मिलिंद कुमार वाघ आदी अधिकारी पोहचले. त्यांच्यासोबत वैद्यकीय पथक देखील होते. पुनर्वसन समितीचे अध्यक्ष महेंद्र बोरसे यांच्यासह ग्रामस्थांशी त्यांनी चर्चा केली. यावेळी गावात साथीच्या आजाराने ग्रासलेल्या रुग्णांना उपचार देण्यात आला. यावेळी डॉ. दिनेश पाटील डॉ. असलम  ,डॉ. स्वप्निल एस देशमुख,  आरोग्य सेवक दिपक पाटील , श्री. पगारे, यानी तपासणी करून औषध उपचार केले.याप्रसंगी गावातील जवळपास  २६० लोकांच्या तपासणी करण्यात आली. सायंकाळी  उशीरापर्यंत तपासणी सुरु होती.आशावर्कर,अंगणवाडी सेविका यांनी वैद्यकीय पथकाला मदत केली.

काल झालेल्या घटनेने तालुक्यासह जिल्ह्यात या घटनेने सर्वत्र जनमन हळहळले आणि या घटनेचा सर्वत्र निषेध करण्यात आला. आरुषी सुरेश भिल (वय-वर्ष १३) दोन दिवसापासून तापाने फणफणत होती.बोरी नदीला पूर आल्याने साहजिकच तिला घेऊन तिचा कुटुंबाला नदी ओलांडून जाणे जीवावर बेतनार.बोरी नदीला जास्त पाणी असल्याने मुलीला दवाखान्यात नेता आले नाही.तर,डॉक्टरांना देखील गावात येणे शक्य नाही.मंगळवारी सकाळी आरुषी अस्वस्थ वाटू लागले,अशातच अधिक ताप वाढल्याने नदी काठावर आणीत गावकर्‍यांच्या मदतीने धाडस केले,होते. तिला खाटेवर बसवून नदी ओलांडून दवाखान्यात उपचारासाठी दाखल करावे म्हणून प्रयत्न करीत असतानाच  झटका येवून तिचा मृत्यू झाला होता. यामुळे सात्री हे गावात राज्यभर चर्चेत आले. शासन आणि प्रशासनाच्या अनास्थेत तेथील गावकर्‍यांच्या धाडसाचे कौतुक करण्यात आले.दरम्यान, आरुषी चा जीव वाचवण्यासाठी स्वतः च्या जीवाची पर्वा न करता महापुराने वेढलेले नदीपात्र पार करण्याचे धाडस दाखविणार्‍या लोकांचा जाहीर सन्मान झाला पाहिजे व मृत आरुषी च्या कुटुंबियांना मदत मिळाली पाहिजे. गरज नाही त्या ठिकाणी  नदीवर ३ ते ४ पूल बांधले जातात, जेथे गरज आहे तेथे दुर्लक्ष केले जाते. आता तरी लोकप्रतिनिधी व निर्ढावलेल्या प्रशासनाला जाग येईल का ?  व या गावचे ग्रहण सुटणार का ? हा समाज मनाला पडलेला एक प्रश्न आहे.

खरं तर, गेली २० ते २२ वर्षांपासून निम्न तापी प्रकल्पात बाधित असलेली नदीकाठावरील पुनर्वसन साठी बरीच गावे लढा देत आहेत. परंतु, निगरगट्ट प्रशासन आरुषी सारखी एखाद दुर्दैवी घटना घडल्याची वाट पाहात बसते.आणि काही दिवस उलटल्यानंतर जैसे थे परिस्थिती निदर्शनास येते. पुनर्वसन होईल तेंव्हा होईल;दरवर्षी पावसाळा होतो.नैसर्गिक आपत्ती येण्याची वाट न पाहता लोकप्रतिनिधी तसेच अधिकारी यांनी आपल्या कर्तबगार व कर्तव्यदक्ष पणाची जाणीव मनाशी बागळुन नदी,नाले ओढे असणार्‍या ठिकणी पुलांची उभारणी करावी. प्रशासनाने या,घटनेतुन काहीतरी बोध घ्यावा व  जेणेकरून भविष्यात पुन्हा अशा दुसर्‍या आरुषी चा जीव जाणार नाही.हीच आरुषी साठी खरी श्रद्धांजली ठरेल.

Protected Content