जळगाव, प्रतिनिधी । पाचोरा शहरातील बागवान मोहल्ला येथील ६५ वर्षीय वृद्धाचा ८ दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. त्याचा रुग्णाचा तपासणी अहवाल काल (२८ एप्रिल) कोरोना पॉझीटीव्ह आला. प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांनी संबंधित परीसर प्रतिबंधित केला असून या भागातील नागरीकांची ये-जा बंद करण्यात आली आहे. यादरम्यान मयत व्यक्तीचा मृत्यूपूर्वी एकूण १३ लोकांशी संपर्क आला होता. त्याबाबत सर्व व्यक्तींची तपासणी करण्यात येत आहे.
संबंधित रुग्णांच्या संपर्कातील कुटूंबीय व इतर व्यक्ती यांची तात्काळ तपासणी करुन त्यातील लक्षणे आढळणाऱ्यांना जिल्हा रुग्णालयात तर इतरांना विघ्नहर्ता रुग्णालय, पाचोरा येथे तालुका आरोग्य अधिकारी व गटविकास अधिकारी यांनी पाठविले आहे. याकामी समर्थ लॉन्स, सारोळा रोड ही इमारत ताब्यात घेण्यात आलेली असून तीव्र लक्षणे असणाऱ्या रुग्णांना विघ्नहर्ता इस्पितळात दाखल करण्यात येत आहे.
भागवान मोहल्ला, समर्थ लॉन्स व शक्तिधाम या वेगवेगळ्या स्थळांचे ठिकाणी अनुक्रमे उमाकांत कडनोर, नायब तहसिलदार, श्री. सनेर, सहाय्यक गटविकास अधिकारी व संभाजी पाटील, नायब तहसिलदार यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे.
पाचोऱ्यात सापडलेला पॉझीटीव्ह रुग्ण व मालेगावचे भौगोलिक सानिध्य यामुळे कोरोनाग्रस्तांची वाढ होऊ नये यासाठी प्रातांधिकारी राजेंद्र कचरे व उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर कातकडे यांनी नागरीकांना सतर्कतेचे आवाहन केले आहे. अतितातडीची गरज असल्याखेरीज कोणीही घराबाहेर पडू नये असे, आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. तथापि, नागरिकांनी घाबरुन जाऊ नये असे आवाहनही करण्यात आले आहे.
यादरम्यान मयत व्यक्तीचा मृत्यूपूर्वी एकूण १३ लोकांशी संपर्क आला होता. त्याबाबत सर्व व्यक्तींची तपासणी करण्यात येत आहे व संसर्गाच्या तीव्रतेनुसार त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव अथवा पाचोरा रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. असे आवाहन तहसीलदार कैलास चावडे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.