पाचोरा, प्रतिनिधी | येथील सामाजिक कार्यकर्ते भालचंद्र ब्राह्मणे यांनी पाचोरा पिपल्स बँकेच्या मनमानी धोरणा विरोधात येत्या प्रजासत्ताक दिनापासून (दि. २६ जानेवारी) पाचोरा सहकार निबंधक कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनाचा आशय असा की, पाचोरा पिपल्स बँकेने कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती नंतर मुदतवाढ देण्याबाबतचा ठराव केला. या ठरावाच्या प्रति योग्य ती फी भरून मागितल्या असता बँक प्रशासनाच्या वतीने त्यास प्रतिसाद न देता याबाबतची कोणतीही कागदपत्रे दिली नाहीत. काही कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मुदत वाढ तर काहींवर जाणीवपूर्वक अन्याय, अतिशय गोलमाल पद्धतीने केलेला ठराव या मनमानी विरोधात दि. २६ जानेवारीपासून उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा तसेच जीवन मरणाचा प्रश्न उद्धवल्यास सहाय्यक निबंधक सहकारी संस्था व पिपल्स बँक व्यवस्थापन जबाबदार राहील असा इशारा भालचंद्र ब्राह्मणे यांनी दिला आहे. निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, सहकारमंत्री, उपमुख्यमंत्री, आमदार, यांचेसह सहकार व बँक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवल्या आहेत.