इस्लामाबाद: वृत्तसंस्था| पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रातांत एका धर्मांध मौलवीच्या नेतृत्वात हिंदू मंदिराची तोडफोड करून आग लावण्यात आली. या घटनेनंतर पाकिस्तान सरकार आणि पोलिसांवर टीका सुरू झाल्यानंतर २६ जणांना अटक करण्यात आली आहे.
मंदिराची तोडफोड झाल्यानंतर पोलिसांनी रात्रभर छापेमारी करत २६ जणांना अटक केली. तर, दुसरीकडे या घटनेची दखल सुप्रीम कोर्टानेही घेतली असून ५ जानेवारी रोजी याची सुनावणी करण्यात येणार आहे. या भ्याड हल्ल्याचा पाकिस्तानमधील हिंदू समुदायाने तीव्र निषेध नोंदवला आहे.
हिंदू संत परमहंस महाराज यांच्या मंदिराला आग लावण्यात आली होती. ही घटना करक जिल्ह्यातील तेरी भागात झाली. या मंदिरात सिंध भागातील हिंदू समुदायातील अनेक व्यक्ती पूजा करण्यासाठी येत असतात. मंदिरावरील हल्ल्या प्रकरणी २६ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. जमावाला चिथावणी देणाऱ्यांचा शोध सुरू असून काही ठिकाणी छापेमारी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. हिंदू समुदायाला या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यास परवानगी मिळाल्यानंतर या मंदिरावर हल्ला करण्यात आला
या घटनेबाबत स्थानिकांनी सांगितले की, एका धार्मिक पक्षाच्या काही स्थानिक वयस्कर नेत्यांच्या नेतृत्वात एक हजारजणांनी निदर्शने केली आणि मंदीर हटवण्याची मागणी केली. हा धर्मांधांचा जमाव मंदिराबाहेर जमला होता. काही चिथावणीखोर भाषणे झाली. त्यानंतर मंदिराची तोडफोड करण्यात आली. हे मंदीर १९२० पूर्वी बनवण्यात आले होते. हे एक ऐतिहासिक स्थळ असल्याचेही स्थानिकांनी सांगितले.
मंदिराविरोधात सुरू असलेल्या चिथावणीखोर मोहीम, भाषणांकडे पोलिसांनी दुर्लक्ष केले. काही दिवस आधी या मंदिरविरोधातील आंदोलनाची घोषणा करण्यात आली होती. तर, करक जिल्ह्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, लोकांनी विरोधाचे आवाहन केले होते. हे आंदोलन शांततेत होणार असल्याचे सांगितले होते. मात्र, मौलवीने लोकांना चिथावणी दिली. त्यानंतर मंदिरावर हल्ला झाला असल्याची माहिती त्यांनी दिली.