पाकिस्तानी कोर्टाकडून हाफिज सैदला १० वर्षांची शिक्षा

 

इस्लामाबाद : वृत्तसंस्था । २००८मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा म्होरक्या आणि जमात उद दावाचा प्रमुख हाफिज सईदला पाकिस्तानातील दहशतवादविरोधी न्यायालयानं दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

न्यायालयानं हाफिज सईदला बेकायदेशीर मार्गानं पैसा पुरवल्याच्या दोन खटल्यांमध्ये ही शिक्षा सुनावली आहे. हाफिजला जुलै २०१९मध्ये अटक करण्यात आली होती.

दहशतवादी कारवायांना पैसा पुरवल्याच्या गुन्ह्यात हाफिज सईदला जुलै २०१९मध्ये अटक करण्यात आली होती. हाफिजविरोधात आतापर्यंत चार खटल्यांमध्ये आरोप निश्चित झाले आहेत. व्यावसायिक कर विभागानं जमात उद दावाच्या नेत्यांविरोधात एकूण ४१ गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये २४ गुन्ह्यांचा निकाल लागला आहे इतर गुन्हे अजूनही न्यायालयात प्रलंबित आहेत.

ऑगस्टमध्ये दहशतवादविरोधी न्यायालयानं कुख्यात दहशतावादी हाफिज सईदच्या वर्तुळातील जमातच्या तीन नेत्यांना तुरूंगवासाची शिक्षा ठोठावली होती. लाहोरमधील मलिक जफर इकबाल आणि शेखपूरा येथील अब्दुल सलाम यांना प्रत्येकी १६ वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा न्यायालयानं सुनावली होती.

हाफिज सईद लश्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेचा संस्थापक आहे. पाकिस्तानमध्येच हाफिज जमात उद दावा नावाची संघटनाही चालवतो. हाफिज सईद २००८मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधारही आहे.

Protected Content