रानडुकराची शिकार करणाऱ्या दोघांना अटक; वनविभागाची कारवाई

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील देव्हारी येथे अवैधरित्या रानडुकराची शिकार करणाऱ्या दोघांना वनविभागाने अटक केली असून दोघांना न्यायाने वन कोठडी सुनावली आहे.

अशोक खेमा चव्हाण (वय 57 वर्षे) मोहन खेमा वंजारी (वय 50 वर्षे) दोन्ही रा. देव्हारी, ता. जळगाव असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. दोघांना जळगाव वन परिक्षेत्राच्या पथकाने रानडुकराचे मास, शिकारीच्या साहित्यासह ताब्यात घेतले. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयात हजर केले असता, दोघांना तीन दिवसांची वन कोठडी सुनावण्यात आली आहे. अशी माहिती जळगावचे वन परिक्षेत्र अधिकारी आर. जी. राणे यांनी दिली आहे.

जळगाव तालुक्यातील देव्हारी गावातील मोहन वंजारी व अशोक चव्हाण या दोघांनी वन्यप्राणी रानडुकराची अवैधपणे शिकार केल्याची माहिती उपवनसंरक्षक विवेक होशिंग यांना मिळाली. त्यानुसार होशिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक चिमाजीराव कांबळे, वनपरिक्षेत्र अधिकारी आर. जी. राणे, विटनेर वनपाल गोकूळ चौधरी, वनपाल पी. जे. सोनवणे, वनरक्षक दिपक पाटील, अभिमन मोरे, सी. व्ही. पाटील, महिला वनरक्षक आश्‍विनी ठाकरे, वैशाली साळी, वाहनचालक डी. डी. पवार यांच्या पथकाने देव्हारी गाव गाठले. याठिकाणी शेतात रानडुकराचे मास भाजत असलेल्या दोघांना ताब्यात घेतले. या कारवाईत पथकाने दोघांकडून 17 किलो मास, कुऱ्हाड, विळा हे शिकारीचे साहित्य असा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

याप्रकरणी वनविभागात वन्यजीव संरक्षक अधिनियम 1972 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची वन कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास वन परिक्षेत्र अधिकारी आर. जी. राणे करीत आहेत.

Protected Content