पुणे : वृत्तसंस्था । राज्यात पावसाने दीर्घ दडी मारली असल्याने पाणीसाठे आणि खरिपातील पेरण्यांबाबत चिंता व्यक्त होत असतानाच पाऊस पुन्हा सक्रिय होणार असल्याचे आनंददायी संकेत भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिले आहेत.
८ जुलैपासून कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार, तर १० जुलैनंतर महाराष्ट्रासह संपूर्ण मध्य भारतात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
जून महिन्यात राज्यात मोसमी पावसाचे आगमन झाल्यानंतर बहुतांश भागात जोरदार पाऊस कोसळला. मात्र, जूनच्या तिसऱ्या आठवडय़ानंतर पावसाचे प्रमाण कमी झाले. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात जवळपास सर्वच ठिकाणी पाऊस गायब झाला.
सध्या कोकणातही पाऊस घटला आहे. विदर्भात तुरळक भागांत हलका पाऊस झाला. बहुतांश भागात खरिपाच्या पेरण्या झाल्या असल्याने आणि काही ठिकाणी त्या रखडल्याने पावसाची वाट पाहिली जात आहे. पावसाची विश्रांती लांबल्यास दुबार पेरणीची टांगती तलवार शेतकऱ्यांवर आहे. त्याचप्रमाणे जलसाठय़ांवरही सध्या परिणाम दिसून येतो आहे. अशा वातावरणात पाऊस पुन्हा सक्रिय होणार असल्याचे संकेत हवामान विभागाकडून देण्यात आले आहेत.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार देशाचा पश्चिम किनारा, पूर्व-मध्य भारत आणि दक्षिण द्वीपकल्पात मोसमी पाऊस ८ जुलैपासून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. या काळात कोकणात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, विदर्भात चंद्रपूर, गडचिरोली आदी भागांत जोरदार पावसाचा अंदाज आहे. पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात आणि उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशाच्या किनाऱ्यावर ११ जुलैला कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार आहे.
कमी उंचीवरून बाष्पयुक्त वारे वाहणार आहेत. त्यामुळे पश्चिम-उत्तर भागात रखडलेला मोसमी पाऊस सक्रिय होण्यासह १० जुलैपासून मध्य भारतात पावसाच्या प्रमाणात वाढ होणार आहे.
पावसाने दडी मारल्यानंतर गेल्या तीन ते चार दिवसांपासून राज्यातील दिवसाच्या कमाल तापमानात वाढ होऊन उन्हाचा चटका आणि उकाडा वाढला आहे. सोमवारीही तापमानवाढ कायम होती. सर्वाधिक तापमानवाढ विदर्भात असून, अकोला येथे राज्यातील उच्चांकी ३८.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. विदर्भात सर्वच ठिकाणी तापमान ३५ ते ३८ अंशांदरम्यान आणि सरासरीपेक्षा २ ते ५ अंशांनी अधिक आहे. मराठवाडय़ात औरंगाबाद, परभणीत कमाल तापमान सरासरीपेक्षा ४.५ अंशांनी अधिक आहे. कोकण विभागात मुंबईसह सर्वच भागात सरासरीपेक्षा २ ते ३ अंशांनी पारा वाढला असून, मध्य महाराष्ट्रात पुणे, महाबळेश्वर, सातारा, नाशिकमध्ये सरासरीच्या तुलनेत ४ ते ५ अंशांनी तापमान वाढले आहे.