काल जे घडलं ते महाराष्ट्राच्या परंपरेला लाजिरवाणं होतं – मुख्यमंत्री

 

मुंबई : वृत्तसंस्था । ”काल जे घडलं, हे कितीही कुणी काही म्हटलं तरी महाराष्ट्राच्या परंपरेला लाजिरवाणं होतं. ही आपली संस्कृती नाही, ही आपली परंपरा नाही. हल्ली जे काही चाललेलं आहे. ते बघितल्यांतर एकूण कामकाजाचा दर्जा हा उंचावण्याकडे आपला कल आहे, की खालवण्याकडे आहे? असा प्रश्न पडतो. पण मी नक्कीच म्हणेन की दर्जा खालावत चाललेला आहे.” असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बोलून दाखवलं.

 

 

विधिमंडळाच्या दोन दिवसीय अधिवेशनाला काल सुरुवात झाली. मात्र अधिवेशनाचा पाहिलाच दिवस वादळी ठरला. ओबीसी राजकीय आरक्षणाच्या मुद्यावरून सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. तर, अध्यक्षांच्या दालनात पीठासीन अधिकारी भास्कर जाधव यांना शिवीगाळ आणि अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भाजपच्या १२ आमदारांना एका वर्षांसाठी निलंबित करण्यात आले. या कार्यवाहीनंतर भाजपाने आक्रमक भूमिका घेतली व आज अधिवेशनाच्या दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशी भाजपाने विधिमंडळाच्या परिसरामध्ये प्रतिविधानसभा भरवली. एवढच नाहीतर आता भाजपा १२ आमदारांच्या निलंबनाविरोधात उच्च न्यायालयात देखील जाणार आहे. दरम्यान या सर्व घडोमोडींच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारपरिषदेत आपली भूमिका मांडली.

 

 

या पत्रकारपरिषदेस उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेस नेते व महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, परिवहनमंत्री अनिल परब यांची देखील उपस्थिती होती.

 

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, ”लोकप्रतिनिधींकडून जनतेची एक वेगळी अपेक्षा असते, की का मी तुम्हाला मत देतोय? तर माझ्या आयुष्यात काही चांगला बदल घडला पाहिजे आणि तो जिथे घडवला जातो, तिथे मी तुम्हाला पाठवतो आहे. तिथे गेल्यानंतर काल जे काही दृश्य पाहायला मिळालं, खरोखर शरमेने मान खाली जावी असं ते दृश्य होतं आणि जबाबदार पक्षाकडून हे घडलं. हे आम्ही घडवलेलं नव्हतं.”

 

Protected Content