जळगाव प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी ते पहूर रोडवरून जाणाऱ्या ट्रकसमोर दुचाकी आडवी लावून चौघांनी दरोडा टाकून ट्रकचालकाकडून ८ हजार रूपये रोख घेवून ट्रचालकासह क्लिनरला मारहाण केल्याची घटना ३० जून रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली होती. या गुन्ह्यातील अटकेत असलेले चौघांनी आज ३१ जुलै रोजी जामीनासाठी अर्ज केला असता तो न्यायालयाने नामंजूर केला आहे.
शुभम प्रकाश बारी (वय २०) रा. वाडी दरवाजा शेंदुर्णी, रोशन दत्तात्रय बडगुजर (वय १९) रा. सोयगाव रोड पाण्याच्या टाकीजवळ, गोरख बापू पाटील (वय १९) रा. वाडी दरवाजा, अक्षय प्रकाश पाटील (वय २०) रा. संजयदादा नगर शेंदुर्णी असे अटकेत असलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
दरोड्याची घटना अशी आहे की, चाळीसगाव तालुक्यातील दहिवद येथील दशरथ बबन बागुल हे ३० जून रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास वाहन चालक असून ते (एमएच १० एडबल्यू ७३३६) क्रमांकाच्या ट्रकने पेपरची जूनी रद्दी घेवून भडगाव पाचोरा मार्गे आकोला येथे घेवून जात होते. शेंदुर्णी ते पहूर रोडवरील गोंदेगावाजवळ पहूरकडे येत असतांना पाच ते सहा युवकांनी ट्रकसमोर दुचाकी लावून वाहन थांबविले. यातच एकाने दुचाकीवरुन खाली उतरून हाताने ट्रकचे हडलाईट फोडीत चालकाच्या खिशातून ८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल लंपास करीत फिर्यादीसह क्लिनरला मारहाण करीत दरोडा टाकला होता. या प्रकरणी पहूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या घटनेत संशयित आरोपीने ट्रकचे हेडलाईट फोडल्याने गंभीर दुखापत झाली होती. संशयित आरोपी हा उपचारासाठी ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी आलेला असल्याचा सुगावा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली. त्यानुसार सीसीटीव्हीच्या आधारे संशयीत आरोपी शुभम प्रकाश बारी (वय २०) रा. वाडी दरवाजा शेंदुर्णी, रोशन दत्तात्रय बडगुजर (वय १९) रा. सोयगाव रोड पाण्याच्या टाकीजवळ, गोरख बापू पाटील (वय १९) रा. वाडी दरवाजा, अक्षय प्रकाश पाटील (वय २०) रा. संजयदादा नगर शेंदुर्णी या चौघे त्यात दिसून आले. पथकाने या चौघांच्या मुसक्या आवळून चौकशी केली असता, त्यांनी दरोडा टाकलयाची कबुली देत गुन्ह्यात वापरलेली दुचाकी देखील काढून दिली. तेव्हापासून ते कारागृहातच होते. आज शनिवारी ३१ जुलै रोजी चौघे संशयित आरोपींनी जामीनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. चौघांचा जामीन अर्ज न्यायालयाने नामंजूर केला आहे.