पहूर येथे ‘गल्ली तुमची सभा आमची’ उपक्रम

पहूर , ता . जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील पालकांचे प्रबोधन करण्यासाठी येथे गल्ली तुमची सभा आमची हा अनोखा उपक्रम राबविण्याचे ठरविण्यात आले.

 

पहूर गावाच्या शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करून गावाला ज्ञान पंढरी बनविण्याचा वज्र निर्धार गुरुजनांनी केला . गावातच दर्जेदार शिक्षणाच्या संधी उपलब्ध असल्याने पालकांनी प्राधान्याने आपल्या पाल्यांना गावातीलच शाळांमध्ये दाखल करायला हवे ,  असा निर्धार सहविचार सभेत करण्यात आला.

सोमवारी महात्मा फुले शिक्षण संस्था संचलित सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात शिक्षक – मुख्याध्यापकांची सहविचार सभा संपन्न झाली.  यात, आर. टी  . लेले  हायस्कूलचे मुख्याध्यापक आर. बी .पाटील,  आर  .बी . आर .कन्या विद्यालयाचे मुख्याध्यापक सुधीर महाजन, सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका व्ही. व्ही. घोंगडे , जय गुरु आनंद इंग्लिश स्कूलचे संचालक रुपेश लोढा, विजय बोरसे,  डॉ. ज्योती चौधरी , हरीभाऊ राऊत, आर. टी. देशमुख,  मनोज खोडपे , सपना कोंडे आदींनी  मनोगत व्यक्त केले .

 

अभिनव उपक्रम

 

शिक्षणाचे महत्त्व पालकांना समजून सांगण्यासाठी गावातील सर्व माध्यमिक शाळांच्या वतीने ’गल्ली तुमची पालक  सभा आमची ’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे . पालकांची वेळ लक्षात घेऊन येत्या २६ रोजी या उपक्रमाची पहिली सभा पहूर – कसबे येथे घेण्यात येणार आहे. यानंतर टप्प्याटप्प्याने पहूर पेठ , संतोषी माता नगर , लेले नगर  ,  ख्वॉंजा नगर , शेरी , लोंढरी , हिवर खेडा  आदी भागात सभांचे आयोजन करण्यात येणार आहे .

 

शालेय स्पर्धांमधून होणार विकास

 

पहूर गावातील सर्व शाळांमध्ये समन्वय ठेवून येणार्‍या शैक्षणिक वर्षात दर महिन्याला किमान एक आंतरशालेय स्पर्धा आयोजित करण्याचा मानस शिक्षकांनी व्यक्त केला . लोकसहभागातून शाळांचा कायापालट करण्यात येणार आहे .

 

गावाचा विकासात शाळेचे योगदान

 

गाव आणि शाळा या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात . ज्या गावातील शाळा समृद्ध असतात हे गाव समृद्ध होते .जे गाव समृद्ध असते , त्या गावातील शाळा समृद्ध होतात .हे समीकरण लक्षात घेऊन गावकर्‍यांनी व लोकप्रतिनिधींनी गावाच्या विकासासाठी गावातील शाळांच्या मूलभूत गरजांकडे प्राधान्याने लक्ष देऊन शाळा समृद्धीसाठी पुढे येणे गरजेचे आहे . शिक्षकांच्या पुढाकाराला लोकप्रतिनिधींची आणि गावकर्‍यांची साथ मिळाली तर नक्कीच पहूर ज्ञान पंढरी झाल्याशिवाय राहणार नाही. दरम्यान, या सहविचार सभेला शिक्षक शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन शंकर भामेरे यांनी केले .बी . एन .जाधव यांनी आभार मानले.

Protected Content